(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Success Story : शेतात कांदा काढताना आनंदाची बातमी... पती-पत्नी जोडीने एकाच वेळी पोलिस भरती झाले
पुणे जिल्ह्यातील शिरूर (Pune) तालुक्यातील नवरा बायकोने पोलीस (Police) भरतीमध्ये जाण्याचे ठरवले होते. शेतात कांदा काढणी सुरू असताना अखेरची मेरिट लिस्ट लागली आणि ही आनंदाची बातमी त्यांच्या कानावर आली.
Pune Success Story : पुणे जिल्ह्यातील शिरूर (Pune News) तालुक्यातील नवरा बायकोने पोलीस (Police) भरतीमध्ये जाण्याचे ठरवले होते. शेतात कांदा काढणी करत असताना अखेरची मेरिट लिस्ट लागली आणि या शेतकरी दाम्पत्याची पोलिस भरतीसाठी निवड झाली. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील चांडोह या गावात राहणारे तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार हे शेतकरी दांपत्य आहे.
2020 मध्ये तुषार आणि भाग्यश्री यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला. दोघांनीही पोलीस व्हायचं, अशी जणू शपथ घेतली होती आणि ती आज पूर्ण झाली आहे. या दोघांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. कांदा कापत असताना अखेरच्या मेरिट लिस्ट लागली आणि या दोघांचा त्यात नंबर लागला. आजचा निकाल नुसता निकाल नाही तर पुन्हा नव्याने लग्न झाल्यासारखं वाटतंय, अशी भावना तुषारने व्यक्त केली आहे.
तुषार आणि भाग्यश्री यांनी गेल्या चार वर्षांपासून पोलीस भरतीसाठी लक्ष केंद्रित केले होते. दररोज व्यायाम, शेतात असणारे घर आणि शेतीतील काम ही त्यांची दिनचर्या असायची. त्यांना हे सर्व करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला एकीकडे कांद्याला भाव न मिळाल्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या मोर्चा निघाला. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे आणि काही झालं तरी स्वप्न पूर्ण करायचं म्हणून आम्ही दोघांनी मन लावून अभ्यास केला आणि आम्ही पास झालो हे सांगताना भाग्यश्रीचा आनंद पोटात मावेनासा झाला होता.
पाऊस नाही, पैसा नाही, ओझं झालं बघा कर्जाचं, शेतकरी हा बुडत जाईल, अशी अशी सध्या शेतकऱ्याची स्थिती आहे. पण तुषार आणि भाग्यश्री यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे, कारण परिस्थितीला कुरवाळत न बसता त्याला तोंड द्या, विजय नक्की तुमचा होईल, असा संदेश हे दोघे देत आहेत.
कुटुंबीय आनंदी...
दोघांची एकाचवेळी पोलीस भरतीत निवड झाल्याने कुटुंबियांचा आनंद गगनात मावत नाही. त्यासोबतच गावकऱ्यांकडूनही त्य़ांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कुटुंबिय़ांनी त्यांची मेहनत जवळून पाहिली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या कष्ठाचं चिज झालं अशा भावना कुटुंबिय़ांनी व्यक्त केली आहे.