(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rain Update : पुण्यात काही परिसरात गारपीट; पुढील चार दिवस वातावरण कसं असेल?
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे, तर काही परिसरात गारपीटीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे.
Pune Rain Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही परिसरात गारपिटीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. भुगाव, सांगवी, औंध या परिसरात गारपीट झाली तर बाकी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली.
त्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय उकाड्याने हैराण झाले होते. आज सकाळपासूनही उन्हाच्या झळा बसत होत्या. अशातच सायंकाळी ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळं परिसरात गारवा निर्माण झाल्यानं शहरवासीय मात्र सुखावले आहेत.
पुढील पाच दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल?
पुढील पाच दिवस पुण्यात काही प्रमाणात ऊन आणि काही प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उद्या (30) दिवसभर काही प्रमाणात ऊन असेल मात्र संंध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणत पावसाचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसामुळे वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडी ही पुण्यातील सगळ्या मोठी समस्या बनली आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र वाहतूक कोंडी संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच पाऊस झाला तर रस्ते तुंबतात आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. संध्याकाळी पुण्यात पाऊस झाला, मात्र या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. सेनापती बापट रोड, फर्ग्यूसन रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, कोथरुड, वनाज आणि चांदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
उन्हापासून पुणेकरांना दिलासा...
मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने तापमानात वाढ होत होती. तापमानाचा पारा 40 अंशावर पोहचला होता. त्यामुळे पुणेकर हैराण झाले होते. तापमान वाढत असल्याने पुण्यात हीट वेव्ह येणार का?, असा प्रश्न अनेक पुणेकरांना पडला होता. मात्र अशी कोणत्याही प्रकारची हीट वेव्ह येणार नसल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं. आज आलेल्या पावसाने पुणेकरांना मात्र चांगलाच दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातमी-
Maharashtra Unseasonal Rain: नागपुरात अवकाळीचं थैमान; भर दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी