Gudi Padwa 2023: पुणेकरांची सोने खरेदीला पसंती, गुढीपाडव्यानिमित्त सराफ बाजारात गर्दी
Gold Rate Today: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला सराफ व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत असते. गुढीपाडवा निमित्त पुण्यात लोकांचा कल हा सोने खरेदीकडे असल्याचं दिसतंय.
Gold Rate Today: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला सराफ व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत असते. गुढीपाडवा निमित्त पुण्यात (Pune) लोकांचा कल हा सोने खरेदीकडे असल्याचं दिसतंय. सोन्याचे दर (gold rate today pune) सध्या गगनाला भिडले आहेत. पण तरीही नागरिक सणानिमित्त मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करताना बाजारात दिसत आहेत. डॉलर इंडेक्समध्ये होणारी घसरण, सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाल्याने शेअर मार्केटमध्ये झालेले चढउतार या सगळ्यामुळे लोक सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघत आहेत. याचबद्दल बोलताना पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सचे शैलेश रांका म्हणाले आहेत की, ''अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली बँक आणि स्विर्त्झंलडची क्रेडिट स्विर्त्झ बँक दिवाळखोर झाली आहे. यामुळे शेअर बाजारातही मोठे चढउतार पाहायला मिळाले आहेत. म्हणून लोकांना सुक्षित गुंतवणूक ही सोन्याची वाटत असल्याने लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदीवर भर देताना दिसत आहेत.''
'भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढणार'
शैलेश रांका म्हणाले की, ''महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण हा मोठा मानला जातो. यातच सोने दर वाढले असले तरी लोक हे मुहूर्त पाहून सोने खरेदी करणारच. यातच दुसरी गोष्ट अशी की, डॉलर्सचे दर ही वरखाली होत आहे. यातच लोक सोने खरेदी गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. कारण भविष्यातही सोन्याचे दर हे वरतीच जाणार आहेत. सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे लोकांचा सोन्यावरील जो विश्वास आहे तो कायम राहणार आहे.''
'मागच्या वर्षापेक्षा यावर्षी होत आहे अधिक सोने खरेदी'
रांका पुढे म्हणाले की, ''मागच्या वर्षापेक्षा यावर्षी सोने खरेदी करताना लोकांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे. कोविडचे दोन वर्ष झाल्यानंतर लोकांचा लग्नसराई आणि इतर कारणांमुळे सोने खरेदी करण्यावर कल वाढला आहे.''
सोन्याच्या दरात 500 रुपयांची घसरण
दरम्यान, आज सोन्याच्या दरात पाचशे रुपयांची घसरण झाल्याने सोने खरेदी करु पाहणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जागतिक पातळीवर अमेरिकेतील काही बँक तोट्यात गेल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी बँकेतील पैसा काढून तो सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दराने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत 62 हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. अशातच उद्या (22 मार्च) गुढीपाडव्याचा सण असल्याने सोने खरेदीच्या मुहूर्तावर या वाढलेल्या दराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत काल (20 मार्च) सोन्याचे दर जीएसटीशिवाय 60 हजार 300 रुपये प्रति तोळा होते, तर जीएसटीसह हेच दर 62 हजार रुपये होते. आज (21 मार्च) यामध्ये पाचशे रुपयांची घसरण होऊन जीएसटीशिवाय सोन्याचा प्रति तोळा दर 59 हजार 700 रुपये तर जीएसटीसह 61 हजार 500 रुपये प्रति तोळा इतका झाला आहेत.