(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Budget 2023 : भिडे वाड्याचा प्रश्न सुटणार? पुण्यातील भिडे वाड्यासाठी 50 कोटींचा निधी; फडणवीसांची घोषणा
पुण्यातील सावित्रीबाई फुले यांनी उभारलेली पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याचा प्रश्न मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटींचा निधी जाहीर केला आहे.
Maharashtra Budget 2023 : पुण्यातील सावित्रीबाई फुले यांनी उभारलेल्या (bhide wada) पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाड्याचा प्रश्न मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी आता अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटींचा निधी जाहीर केला आहे. आज अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यात भिडे वाड्यासाठी निधी जाहीर केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत. त्यानंतर भिडे वाड्याच्या जागेसाठी चंद्रकात पाटील यांनीदेखील भाडेकरुंची आणि मालकांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासमवेत पुण्यातील निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली होती. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तिथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील केले होते.
भिडे वाड्यातील भाडेकरुंना 10 मार्चच्या आत रेडीरेकनरनुसार मोबदला मिळणार
पुण्यातील भिडे वाड्याच्या प्रश्नावर न्यायालयात (Bhide wada pune) सुनावणी सुरु आहे. येत्या 10 तारखेला या प्रश्नावर पुन्हा सुनावणी असून हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी 10 मार्चच्या आत भाडेकरुंना रेडीरेकनर तसेच बाजारमूल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली होती. त्यामुळे भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. येत्या 10 तारखेला या प्रश्नावर सुनावणी असून हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी 10 मार्चच्या आत भाडेकरुंना रेडीरेकनर तसेच बाजारमूल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचा अहवाल कोर्टास सादर करुन हा प्रश्न सोडवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली होती. आता या अर्थसंकल्पात निधी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे भिडे वाड्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.