Marathi | मराठी भाषेवरही बलात्कार..... मराठी पाट्यावरून निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकरांनी व्यक्त केला संताप
मराठी बोलताना मराठी कमी आणि हिंदी जास्त, तर काही महाभाग बोलताना ब्रिटिशांनी सांभाळ केल्यासारखं इंग्रजी बोलून मराठी बोलण्याचे मुद्दामच टाळत असल्याचे दिसते अशा प्रकारच्या भावना निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी व्यक्त केल्या आहेत
मुंबई: शहरातील एका हॉटेलने लिहलेल्या मराठी भाषेतील पाटीवर संताप व्यक्त करुन मराठी आणि अमराठी व्यवसायिकांना मराठी भाषेवर बलात्कार केला आहे असं मत निर्माता दिग्दर्शत महेश टिळेकर यांनी व्यक्त केलंय. हॉटेल बाहेरची मराठीतील पाटी वाचून त्या डोक्यावरून जाणाऱ्या भाषेला मराठी का म्हणायचे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
आज राज्यभर मराठी भाषा दिन साजरा केला जात असताना निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकरांनी मुंबईतील चुकीच्या पद्धतीने लिहलेल्या मराठी भाषेवर संताप व्यक्त केलाय. माहिम भागातील स्टेटस नावाच्या एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मराठी भाषेची पाटी लिहल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावर त्यांनी मराठी भाषा लिहायला आफ्रिका, अफगाणिस्तनमधून माणूस बोलवला होता का? असाही सवाल व्यक्त केला.
महेश टिळेकर म्हणतात की, "मराठी भाषेची लाज काढणारे काही कलाकार मराठी चित्रपट मालिका क्षेत्रात आहेत. महाराष्ट्रात आणि मराठी कुटुंबात जन्म घेऊन आत्ताच्या पिढीतील काही कलाकारांना मालिका, चित्रपटात काम करताना मराठीतून संवाद बोलण्या पुरताच काय तो मराठीशी संबंध असतो. रोजच्या आयुष्यात मराठीत बोलण्याची का त्यांना शरम वाटते ते कळत नाही. मराठी बोलताना मराठी कमी आणि हिंदी जास्त, तर काही महाभाग बोलताना ब्रिटिशांनी सांभाळ केल्या सारखं इंग्रजी बोलून मराठी बोलण्याचे मुद्दामच टाळत असल्याचे दिसते. काही मराठी कलाकार उगाच आपलं स्टेटस, लेव्हल किती उच्च दर्जाचं आहे हे दाखवण्याचा खोटा आव आणण्यासाठी इंग्रजाळलेले दिसून येतात. पण मराठीतील त्यांचा अभिनय काय दर्जाचा असतो यावर कधी आत्मचिंतन करावे असे त्यांना का वाटत नाही? हे कलाकार जेवताना रोज मराठमोळं जेवण खात असतील की इतर कुठलं?"
आपल्या मराठी भाषेचा अभिमान फक्त मराठी भाषा दिनानिमित्त फेसबुक, इंस्टा ला पोस्ट टाकण्या पुरता मर्यादित नसावा. आपण आपल्या आईचा आदर करतो तसा मातृभाषा मराठीचा आदर,सन्मान केलाच पाहिजे,भाषाधन ही पण आपली संपत्ती आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
बंगालमध्ये अशाच प्रकारचे एक प्रकरण घडलं होतं. एयरटेलने आपल्या एका जाहिरातीत इंग्रजी भाषेतील बंगाली भाषेत चुकीच्या पद्धतीने अनुवाद केला होता. त्यावर बंगालमधील लोकांनी त्याला प्रचंड विरोध केला. लोकांच्या या वाढत्या दबावामुळे एयरटेलने आपली जाहिरात मागे घेतली होती आणि जनतेची माफी मागितली होती. बंगाली लोकांनी आपल्या भाषेबद्दल जो आदर आणि प्रेम दाखवला तो आदर मराठी लोक दाखवणार का असा प्रश्न पडतोय.
महेश टिळेकरांच्या भावना त्यांच्याच शब्दात...
मराठी भाषेवरही बलात्कार
मैलो मैलावर मराठी भाषा बदलत जाते तशी भाषेची गोडी वाढत जाते. मराठी भाषेची सक्ती झाल्यानंतर महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे व्यवसाय करणाऱ्या दुकाने,हॉटेल यांना नाईलाजाने का होईना मराठी भाषेत नावे, पाट्या लावाव्या लागल्या,यातल्या मराठी आणि अमराठी व्यवसायिकांना मराठी भाषेवर ज्या पद्धतीने बलात्कार केला आहे तो पाहून हसावे की रडावे असा प्रश्न पडतो.मुंबईतील माहीम भागातील स्टेटस नावाच्या एका हॉटेल मध्ये मित्राच्या घरगुती कार्यक्रमा निमित जेवायला गेल्यावर हॉटेल बाहेरची मराठीतील पाटी वाचून त्या डोक्यावरून जाणाऱ्या भाषेला मराठी का म्हणायचे असे वाटू लागले.. संबंधित हॉटेल मधील कर्मचारी,मॅनेजर सगळ्यांना मी मराठी पाटीवर लिहिलेली मराठी भाषा लिहायला आफ्रिका, अफगाणिस्तनमधून माणूस बोलवला होता का? असं विचारल्यावर त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. मराठी भाषेची लाज काढणारे काही कलाकार मराठी चित्रपट मालिका क्षेत्रात आहेत. महाराष्ट्रात आणि मराठी कुटुंबात जन्म घेऊन आत्ताच्या पिढीतील काही कलाकारांना मालिका,चित्रपटात काम करताना मराठीतून संवाद बोलण्या पुरताच काय तो मराठीशी संबंध असतो. रोजच्या आयुष्यात मराठीत बोलण्याची का त्यांना शरम वाटते ते कळत नाहीकाहीजण.मराठी बोलताना मराठी कमी आणि हिंदी जास्त,तर काही महाभाग बोलताना ब्रिटिशांनी सांभाळ केल्या सारखं इंग्रजी बोलून मराठी बोलण्याचे मुद्दामच टाळत असल्याचे दिसते. काही मराठी कलाकार उगाच आपलं स्टेटस,लेव्हल किती उच्च दर्जाचं आहे हे दाखवण्याचा खोटा आव आणण्यासाठी इंग्रजाळलेले दिसून येतात.पण मराठीतील त्यांचा अभिनय काय दर्जाचा असतो यावर कधी आत्मचिंतन करावे असे त्यांना का वाटत नाही?हे कलाकार जेवताना रोज मराठमोळं जेवण खात असतील की इतर कुठलं????? काही दिवसां पूर्वी एका मराठी चॅनेल वर एक चित्रपट सुरू होता.अनेक मोठे कलाकार त्या सिनेमात होते.सिनेमातील हिरोईन एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, जीचं तिच्या दिरा बरोबर लफडे आहे असा संशय घेऊन नवरा तिला घराबाहेर काढतो. दिराला जेंव्हा ही बातमी समजते तेंव्हा तो आई वडील,मोठा भाऊ सगळ्यांशी भांडतो आणि सांगतो " जो पर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनातील संशयाचा चिखल धुतला जात नाही तो पर्यंत मी घरात पाऊल ठेवणार नाही". ह्या सीन मध्ये असणाऱ्या एकाही मोठ्या कलाकाराला ही भाषा कशी नाही खटकली ? चिखल खरंच धुतला जातो का? बरं तो संशयाचा चिखल जर धुतला जात असेल तर तो धुतल्यावर सुकतो कसा? रोजच्या जीवनात तरी आपण बोलताना संशयाचा चिखल असं कधी म्हणतो का,असा साधा विचार वर्षानुवर्ष अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना डायलॉग बोलताना का येऊ नये,त्यांना आपण काय बोलतोय याचे भान का नसावे? की आपल्या कामाचे पैसे मिळाले ना मग बस,ही भावना असते की काय? आपल्या मराठी भाषेचा अभिमान फक्त मराठी भाषा दिनानिमित्त फेसबुक, इंस्टा ला पोस्ट टाकण्या पुरता मर्यादित नसावा. आपण आपल्या आईचा आदर करतो तसा मातृभाषा मराठीचा आदर,सन्मान केलाच पाहिजे,भाषा धन हीपण आपली संपत्ती आहे ???? महेश टिळेकर निर्माता दिग्दर्शक
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित 'पत्रलेखन' स्पर्धेला भरभरून प्रतिसाद