प्रश्न महाराष्ट्राचे : आज दिवसभर एबीपी माझावर महाचर्चा; दिग्गज नेते, मंत्र्यांना जनतेचे सवाल
Prashna Maharashtra che Abp Majha आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.
Prashna Maharashtra che : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi) येऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक घोषणा केल्या गेल्या, सोबतच विकासकामांचे दावे देखील केले गेले. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना सारख्या महाभयंकर लाटेचा सामना करावा लागला. सरकारसमोर अनेक अडचणी आल्या. केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असल्याच्या भावना राज्य सरकारमधील बड्या नेत्यांनी वारंवार व्यक्त केल्या. सत्ताधारी आणि विरोधी पक्षानं एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले.
अशात सामान्य माणसांचे प्रश्न कुठंतही मागे राहिल्याचं चित्र आहे. महागाई, रोजगार, शेतीसमोरील आव्हानं, उद्योगातील समस्या असे अनेक सवाल सामान्य माणसांसमोर उभे ठाकले आहेत. याच निमित्तानं आज एबीपी माझावर 'प्रश्न महाराष्ट्राचे' हा कार्यक्रम होणार आहे. यात मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागातून सामान्य नागरिकांचे सवाल उत्तरदायी असलेल्या नेत्यांना मंत्र्यांना विचारले जाणार आहेत.
राज्यातील दिग्गज नेते आणि मंत्र्यांचा सहभाग
या कार्यक्रमात सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सहभाग घेतील. त्यांच्याशी कायदा सुव्यवस्था विषयावर संवाद होणार आहे. तर 11 वाजता शालेय शिक्षण व्यवस्थेवर राज्यमंत्री बच्चू कडू हे सहभाग घेणार आहेत. 12 वाजता कृषीसंदर्भातील प्रश्नांवर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी संवाद साधला जाईल.
दुपारी एक वाजता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. तर दुपारी 2 वाजता मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गृहनिर्माण संबंधी प्रश्नावर चर्चा होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ दुपारी तीन वाजता या कार्यक्रमात भाग घेतील तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे सायंकाळी 4 वाजता प्रश्नांची उत्तरं देतील.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील 4.30 वाजता या कार्यक्रमात सहभागी होतील तर महसूल संबंधी प्रश्नांवर बोलण्यासाठी मंत्री बाळासाहेब थोरात हे 5 वाजता कार्यक्रमात सहभागी होतील.
कुठे पाहाल कार्यक्रम
हा सर्व कार्यक्रम आपण आज दिवसभर एबीपी माझा चॅनलवर पाहू शकणार आहोत. तसेच एबीपी माझाच्या यू ट्यूब चॅनेलवर दिवसभर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. सोबतच एबीपी माझाच्या वेबसाईट, फेसबुक, ट्विटरवरही कार्यक्रमाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत.