PM Modi Oath Taking Ceremony Live : राज्यात 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; शिंदे गट आणि रामदास आठवलेंना सुद्धा संधी, अजित पवार गट अजूनही गॅसवर
PM Modi Oath Taking Ceremony Live : महाराष्ट्रामधून पाच जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झालं आहे. ज्या खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार आहे, त्यांना दिल्लीतून फोनाफोनी केली जात आहे.

PM Modi Oath Taking Ceremony Live : राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारचा आज शपथविधी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एनटीए सरकारचे पंतप्रधान म्हणून आज दिल्लीमध्ये शपथ घेत आहेत. दरम्यान, एनडीए सरकारमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार? याची चर्चा रंगली असतानाच महाराष्ट्रामधून पाच जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झालं आहे. ज्या खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार आहे, त्यांना दिल्लीतून फोनाफोनी केली जात आहे.
भाजपच्या तीन खासदारांना मंत्रिपदासाठी फोन
यामध्ये महाराष्ट्रातून आतापर्यंत भाजपचे नितीन गडकरी, पियुष गोयल आणि उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा मंत्रीपदाची संधी देण्यात आली आहे. दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार यांच्या वाट्याला किती मंत्रीपदे येणार याचीही चर्चा रंगली असताना शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.
अजित पवार अजूनही वेटिंगवर
गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र, प्रफुल पटेल यांना अजूनही कोणताही फोन गेलेला नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्लीत तळ ठोकला आहे. मात्र, अजूनही त्यांना मंत्रिपदाबाबत फोन आलेला नाही. त्यामुळे अजित पवार गट मंत्री पदासाठी अजूनही वेटिंगवर असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राज्यामध्ये मंत्रिपदी देत असतानाच प्रादेशिक समतोल राखला जाणार आहे. याचा विचार केल्यास विदर्भातून नितीन गडकरी हे मंत्रीपदी असतील, तर मुंबईतून पियुष गोयल असणार आहेत. रामदास आठवले जातीय समीकरणातून मंत्रीपदी असतील, तर उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातून मंत्रीपद दिले जाते का? याकडे सुद्धा लक्ष आहे.
नारायण राणेंना अजूनही फोन नाही
विशेष म्हणजे नारायण राणे यांना मंत्रिपदासाठी अजून फोन गेलेला नाही. त्यामुळेही भूवया उंचावल्या आहेत. उदयनराजे भोसले यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती. मात्र, अजून त्यांना फोन आलेला नाही. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रादेशिक पक्षांना महत्त्व प्राप्त झाल्याने त्यांना सुद्धा मंत्रीपद जाणं अपेक्षित आहेत. नितेश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपीने महत्त्वाच्या पदांवर दावा केल्याने नेमकी कोणती मंत्रिपदे दिली जाणार? याकडे सुद्धा लक्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
