Pandharpur : पंढरपूरमध्ये रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन, अद्याप प्रक्रिया सुरुच
Pandharpur Vitthal Rukmini Mandir News : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात आलं आहे. रात्री मूर्तीच्या पायावर जवळपास तीन तास ही लेपन प्रक्रिया सुरु होती.
Pandharpur Vitthal Rukmini Mandir News : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर वज्रलेपन करण्यात आलं आहे. रात्री मूर्तीच्या पायावर जवळपास तीन तास ही लेपन प्रक्रिया सुरु होती. विठ्ठल रखुमाईच्या पायावर भक्तांकडून डोकं टेकवल्यामुळे पायाची झीज होत असल्याची माहिती समोर आलं होतं. त्यामुळे ही लेपन प्रक्रिया करण्यात आली आहे. तसंच विठ्ठल मूर्तीची थोडी झीज झाली असून गरज वाटल्यास मूर्तीवरही लेपन करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. माहितीनुसार रुक्मिणी पायाच्या वज्रलेपाची प्रक्रिया अजून अर्धवट आहे. आज दुपारी उरलेली प्रक्रिया पूर्ण होणार आहे. उद्यापासून रुक्मिणी मातेच्या पायाचं दर्शन सुरु होणार असल्याची शक्यता आहे.
रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप प्रक्रिया आज दुपारी पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. काल रात्री या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार रुक्मिणी मातेची खराब झालेली पावले काढून नवीन पावले बनविण्यासाठी मापे घेण्यात आली. आज पहाटे ही पावले बनविण्याचे काम सुरू झाले असून दुपारी 11 वाजता ही पावले बसवली जाणार असल्याचे समजते. आज सकाळीपासून रुक्मिणीच्या गाभाऱ्या बाहेरून भाविकांना दर्शन सुरू असून देवीच्या पायाजवळ चांदीची पावले बसविली आहेत. मात्र मंदिर प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.
रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघाल्याचे वास्तव ABP माझाने समोर आणले होते. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाने मंदिराची पाहणी केली होती. त्यांनी आषाढीपूर्वी मूर्तीवर लेपन करण्याची तयारी केली होती.
कोरोनाकाळात लॉकडाऊन सुरु असताना 23 आणि 24 जून 2020 रोजी पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला होता. पुरातत्व विभागाने विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीच्या पायावर सिलिकॉनचे लेप दिले होते. हा लेप पुढील 7 ते 8 वर्षे तसाच राहिल असा दावा करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या पायावरील दर्शन 2 एप्रिलपासून सुरु करण्यात आले. यावेळी मूर्तीच्या पायाची मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याच्या तक्रारी भाविकांतून करण्यात आल्या. या प्रकरणाचे वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते.
भाविकांनी केली होती नाराजी व्यक्त...
मूर्तीच्या पायाची झालेल्या झीजबद्दल वास्तव एबीपी माझाने समोर आणले होते. त्यानंतर अनेक महिला वारकरी, भाविकांनी रुक्मिणीच्या पायाला झालेल्या जखमा तातडीने दुरुस्त करा अशा भाषेत नाराजी व्यक्त केली होती. तर काही भाविकांनी ही झीज थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यांनतर मंदिर प्रशासनाने यांची दखल घेत बैठक बोलावली होती.
इतर संबंधित बातम्या