ABP Majha Impact : विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी मंदिर समिती तातडीची बैठक घेणार
23 आणि 24 जून 2020 रोजी पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर मूर्तीच्या पायाची झीज होत असल्याच्या तक्रारी भाविकांतून करण्यात आल्या.
![ABP Majha Impact : विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी मंदिर समिती तातडीची बैठक घेणार Pandharpur news Temple committee to hold emergency meeting on Vitthal and Rukmini idol erosion case ABP Majha Impact : विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती झीज प्रकरणी मंदिर समिती तातडीची बैठक घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/12/d66eace869069f351cacf6691a81356c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : अतिशय अल्पावधीत पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेप निघू लागल्याचे काल (11 एप्रिल) एबीपी माझाने समोर आणली होती. त्यानंतर आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तातडीची बैठक घेणार असल्याचं सांगितलं. वास्तविक लॉकडाऊन सुरु असताना 23 आणि 24 जून 2020 रोजी पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला होता. पुरातत्व विभागाने विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीच्या पायावर सिलिकॉनचे लेप दिले होते. हा लेप पुढील 7 ते 8 वर्षे तसाच राहिल असा दावा करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या पायावरील दर्शन 2 एप्रिलपासून सुरु करण्यात आले. मात्र यावेळी मूर्तीच्या पायाची मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याच्या तक्रारी भाविकांतून करण्यात आल्या.
याचं वास्तव काल एबीपी माझाने दाखवल्यावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याची गांभीर्याने दाखल घेत आज (12 एप्रिल) चैत्री एकादशीला तातडीने बैठक बोलावणार असल्याचं सांगितलं. रुक्मिणी मातेच्या पायावरील झालेली झीज ही धक्कादायक असून या संदर्भात पुरातत्व विभागाशी तातडीने संपर्क साधून दुरुस्ती करणार असल्याचे औसेकर यांनी सांगितलं. मूर्तीचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पुरातत्व विभाग सुचवेल त्या पद्धतीने तातडीने उपाययोजना करणार असल्याचेही औसेकर यांनी सांगितलं.
भाविकांच्या तक्रारी
दरम्यान आज देखील भाविकांनी मूर्तीच्या पायाची झालेल्या झीजबद्दल एबीपी माझाशी बोलताना नाराजी व्यक्त केली. काही महिला वारकरी भाविकांनी तर रुक्मिणीच्या पायाला झालेल्या जखमा तातडीने दुरुस्त करा अशा भाषेत नाराजी व्यक्त केली. तर काही भाविकांनी ही झीज थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
विठूरायाची वालुकाष्म दगडापासून बनवलेली मूर्ती असून ती 'नाही घडविला नाही बैसविला' अशी स्वयंभू असल्याचे वारकरी संप्रदायाचे मानणं आहे. पूर्वी वारंवार होणाऱ्या पंचामृताच्या अभिषेकाने या मूर्तीची झीज होत असल्याचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यानंतर देवावरील हे अभिषेक बंद करण्यात आले होते. मात्र तरीही मूर्तीची झीज होत असल्याने तिच्यावर आतापर्यंत चार वेळा वज्रलेप करण्यात आले होते. रुक्मिणी मातेची मूर्ती ही गंडकी पाषाण म्हणजेच शाळीग्राम दगडाची असून ती अतिशय गुळगुळीत आहे. मात्र या मूर्तीच्या पायाची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने या पायावर दरवेळी वज्रलेप केला जात असतो. आता पायावर दर्शन सुरु होऊन केवळ दहाच दिवस झाले असताना रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाचे तुकडे पडल्याने पायाची दूरवस्था झाली आहे. आता इतक्या कमी वेळात दर्शन बंद असताना या दोन्ही मूर्तींची झीज कशामुळे झाली याचा पुरातत्व विभागाला अभ्यास करावा लागणार. ही झीज रोखण्याचे मोठे आव्हान आता पुरातत्व विभागासमोर उभं राहिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)