Pandharpur News : विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दागिन्यांचे डॉक्युमेटेंशन पूर्ण, कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Pandharpur News : विठुरायाच्या खजिन्यात अंत्यंत पुरातन आणि मौल्यवान हिरे , रत्ने , माणिक , पाचू अशा विविध अलंकारांची भरमार आहे. देवाच्या खजिन्यात मुख्य 50 प्रमुख अलंकार आहेत.
पंढरपूर : विठुरायाच्या चरणी रंकांप्रमाणे अनेक राजे रजवाडे आणि सरदारांनीही मौल्यवान दागिने अर्पण केलेले आहेत. विठुरायाचा हा खजिना इतर कोणत्याही मोठ्या देवस्थानांपेक्षा नक्कीच कमी नाही. प्रत्येक सणाला विठ्ठल रुक्मिणीला अशा अतिशय मौल्यवान दागिन्यात मढविण्यात येत असते. देवाच्या दागिन्यांबाबत देशभरातील जनतेला आकर्षण असते. त्यामुळेच देवाचे सुवर्णमयी रूप पाहण्यासाठी हजारो भाविक येत असतात. आता याच देवाच्या खजिन्यातील अनमोल अशा पुरातन मौल्यवान दागिन्यांचे फोटोसह नोंदी घेण्याचे काम पूर्ण होत आलेले आहे. देवाचे सर्व अलंकाराचे फोटो आणि माहिती असणाऱ्या या अल्बमचे प्रकाशन येत्या कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती मंदिर समिती सदस्यता माधवीताई निगडे यांनी दिली. निगडे यांनीच यासाठी पुढाकार घेतला असून मंदिर समितीचा ठराव झाल्यानंतर निगडे यांनी हे समिती कर्मचाऱ्यांच्या मदतीने डॉक्युमेंटेशनचे काम करून घेतले आहे .
असा आहे देवाचा खजिना
आज विठुरायाच्या खजिन्यात अंत्यंत पुरातन आणि मौल्यवान हिरे , रत्ने , माणिक , पाचू अशा विविध अलंकारांची भरमार आहे. देवाच्या खजिन्यात मुख्य 50 प्रमुख अलंकार आहेत. यात अत्यंत मौल्यवान कौस्तुभ मण्यासह अनेक दागिने किती वर्षापूर्वीचे आहेत यांच्या नोंदीचा सापडत नाहीत. अठराव्या शतकापासून दागिन्यांच्या नोंदी पूर्वीच्या काळात सापडत असल्या तरी असंख्य दागिन्यांचा काळ आजच्या सुवर्णकारांना देखील लागणे मुश्किल आहे. बडवे समाजाने ठेवलेल्या नोंदी प्रमाणेच 1985 पासून शासनाच्या मंदिर समितीने नोंदी केल्या आहेत. विठुरायाच्या खजिन्यातील 104 पुरातन मोती हिऱ्याचे पदक आणि पाचूचे लोलक असलेली मोत्याची कंठी, मोत्यांचा चौकडा जोड, 46 मोत्यांची कंठी ज्याच्या पदकात हिरे , माणिक असे अनमोल रत्ने जोडलेले आहेत. हिऱ्याची मंडोळी , 10 पेट्यांचा सुवर्ण कंबरपट्टा, माणकाचे पदक यात बसवलेले मौल्यवान मत्स्य हिरे आणि पाचू असलेली कंठी, मत्स्य मकरावर जोड, 41 पानड्याचा हिऱ्यांचा हार, हिरे मंकणी जडावलेल्या मोठ्या बाहुभूषणे , हिरे , पाचू , माणिक याने जडवलेला शिरपेच , तोरडी अर्थात हिऱ्यांचे पैंजण , माणिक आणि हिरेजडित नाम, नीलमण्याचा नाम, सोन्याचे तोडे, सोन्याचे टोप, सोन्याचे कडे, सोन्याचा चंद्रहार , मोहरांचा हार , जवेची , बोरमाळ व पुतळ्यांच्या सोन्याच्या माळा , सोन्याचे सोवळे , पागोटे असे असंख्य दागिने शेकडो वर्ष पुरातन असून यांच्या नोंदी सापडत नसल्याने हे खूप पुरातन अलंकार आहेत.
यामध्ये हिरे पाचू आणि मोत्यांनी जडवलेली सोन्याची बाजीराव कंठी हे शेवटच्या बाजीराव पेशव्यांनी अर्पण केलेली आहे. ग्वाल्हेरच्या जयाजीराव शिंदे यांनी हिरे पाचू यांनी मढवलेला लफ्फा अर्पण केलेला आहे. कोल्हापूरच्या राणी साहेबानी देवाला नवरत्न हार दिलेला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी देवाला हिऱ्याची मोरमंडोळी दिली आहे. कोल्हापूरच्या राणी सकवारबाई यांनी देवाला हिऱ्याचे कंगन दिले आहेत. तंजावरचे श्रीमंत विजयवर्धा भोसले यांनी माणिक मोत्याची कंठी अर्पण केलेली आहे . हैदराबादचे राजा शिवराज बहाद्दूर यांनी पाचूंनी जडलेला कलगी शिरपेच अर्पण केला आहे . श्रीमंत राजमा राणीसाहेब व्यंकटगिरी यांच्यातर्फे हिरे माणिक जडवलेली कंठी दिलेली आहे. अगदी अलीकडे 1910 मध्ये बाळकृष्णबुवा अमळनेरकर यांनी सोन्याची तुळशीमाळ अर्पण केलेली आहे. अलीकडच्या काळात देखील असंख्य भाविक सोने आणि हिऱ्यांचे दागिने विठुरायाला अर्पण करीत असतात.
रुक्मिणी मातेचा खजिना देखील 82 अनमोल अलंकाराने सजलेला आहे. रुक्मिणी कंदील दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे देवीच्या सतराव्या शतकापासून असलेल्या अलंकारांच्या नोंदी सापडतात. रुक्मिणी मातेच्या दागिन्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यातील तब्बल 35 मौल्यवान अलंकार हे उत्पात समाजानेच बनवून घेत देवीला अर्पण केलेले आहेत . रुक्मिणी मातेच्या अलंकारात श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी दिलेली सोन्याच्या 60 मोहरांची माळ, शिंदे सरकार घराण्याकडून रुक्मिणी मातेला अनेक अलंकार अर्पण करण्यात आलेले आहेत. यात मोत्याचे लहान मोठे कंठे , हिरेजडित पाचूची गरसोळी, हिरेजडित तानवड जोड , कमालखाणी म्हणजेच पाचपदरी शिंदे हार, सोन्याचे चुडे , मणी मोत्यांच्या पाटल्या , हिरेजडित सूर्य , 23 माणिक असलेला चंद्रमा हे मौल्यवान अलंकार आहेत. बडोदे येथील भाऊसाहेब शिंदे यांनीही मातेला सोन्याचे तोडे जोड अर्पण केलेले आहेत. याच पद्धतीने अहिल्यादेवी होळकर यांनी रुक्मिणी मातेला सोन्याच्या घुंगुरांचे पैंजण, हिरेजडित बाजूबंद , मोत्याचा कंठ , पानाड्याचा बिंदी बिजवरा , हिरेजडित बाटल्यांचा जोड असे अलंकार अर्पण केले आहेत.
हैदराबादचे राजे चंदुलाल दिवाण हे देखील रुक्मिणीमातेचे निस्सीम भक्त होते. राजे चंदुलाल दिवाण यांनी मातेला नवरत्न हार , जडावाचा हार , मास पट्टा , हिरेजडित कर्णफुले , 32 पेट्या आणि एक वरवंटा असलेली असलेला सोन्याचा हायकोल , सोन्याचा नऊ पदरी चंद्रहार , सोन्याचे रूळ जोड , सोन्याचा पाच पदरी चंद्रहार असे अनेक मौल्यवान अलंकार अर्पण केले . हैदराबादचे राजे समबक्ष यांनीही अठराव्या शतकात जडावाची गरसोली अर्पण केली आहे . याशिवाय इतर भक्तांनी सोन्याचा झेला, सोन्याच्या तुळशीमाळा , सोन्याचा सात पदरी अष्टपैलू मण्यांचा कंठा , सोन्याचे वाक्य जोड , असंख्य प्रकारचे कंगन व इतर लहान मोठे मौल्यवान अलंकार अर्पण केले आहेत . उत्पात समाजाने देवीला सोन्याचा कोल्हापुरी साज , जावेची माळ , 64 पुतळ्यांची माळ , मत्स्य जोड मकराकार , पदकासह तारामंडळ , हिरे आणि तांबडे माणिक जाडीत चिंचपेटी , सोन्याचे मुकुट आणि अनेक लहान अलंकार करून घेतलेले आहेत . श्रीमंत वायजाबाई शिंदे सरकार यांनी रुक्मिणी मातेला सोन्याचे पातळ अर्पण केलेलं आहे. रुक्मिणी मातेकडे देशातील कोणत्याही श्रीमंत देवस्थानात देवीला असणारे बहुतेक सर्व प्रकारचे पुरातन आणि मौल्यवान दागिन्यांचा खजिना आहे .
डोळे दिपवणारं रखुमाईचं लखलखतं ऐश्वर्य