(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari : तयारी आषाढीची! पंढरपूरसह 10 गावात संचारबंदी, महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह 50 लोकांनाच परवानगी
Pandharpur Adhadhi wari :कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे.
पंढरपूर : : आषाढी यात्रेसाठी आजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या संकटात सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह येणार असून यावेळी केवळ 45 ते 50 व्हीआयपी व अधिकारी मंदिरात उपस्थित असणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात
कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून आजपासून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात संचारबंदीला सुरुवात झाली आहे. यामध्ये औषध दुकाने आणि दूध विक्रेते याशिवाय कोणालाही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. आज सकाळी सहा पासून पोलिसांनी शहर व परिसरात गस्त वाढवल्याने सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत असून केवळ आपत्कालीन यंत्रणेतील लोकांनाच यातून सूट देण्यात आलेली आहे. पंढरपूरकडे येणारे सर्व 48 मार्ग पोलिसांकडून बंद करण्यात आले असून कोणालाही पंढरपूर मध्ये प्रवेश दिला जात नाही. विठ्ठल मंदिर परिसरातही जोडणारे सर्व मार्ग लोखंडी बॅरिकेटिंग लावून बंद करण्याचे काम सुरु करण्यात आल्याने विठ्ठल मंदिर परिसरात कोणालाही प्रवेश दिला जात नाही . पंढरपुरात केवळ 400 वारकरी येणार असले तरी कोरोनाच्या धोक्यामुळे 3 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत . पोलिसांनी शहरातील 500 पेक्षा जास्त मठांची तपासणी करून संचारबंदीपूर्वी शहरात येऊन मठात राहिलेल्या वारकरी आणि भाविकांना परत पाठवले आहे .
Ashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई, पाहा नेत्रदीपक फोटो
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महापूजेच्यावेळी केवळ 45 ते 50 जणच राहणार उपस्थित
कोरोनाच्या संकटात सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसह येणार असून यावेळी केवळ 45 ते 50 व्हीआयपी व अधिकारी मंदिरात उपस्थित असणार असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. आषाढी एकादशीच्या पहाटे म्हणजे 20 जुलै रोजी पहाटे मुख्यमंत्री दोन वाजण्याच्या सुमारास विठ्ठल मंदिरात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. यावेळी विठ्ठल गाभारा आणि चौखांबीमध्ये केवळ मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय , मानाचा वारकरी आणि मंदिरातील पुजारी एवढेच उपस्थित असणार असून मागे सोळखांबी मध्ये मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी दिलेले व्हीआयपी , अधिकारी आणि मंदिर समिती सदस्य उपस्थित असतील . महापूजेस मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची RTPCR तपासणी केलेली असून केवळ रिपोर्ट निगेटिव्ह आलाय त्यालाच उपस्थित राहता येणार आहे .
400 वारकऱ्यांसाठी 3 हजार पोलिसांचा बंदोबस्त
विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण
महापूजेनंतर मंदिर समितीने केलेल्या विठुरायाच्या नवीन प्रतिमांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते केले जाणार आहे. यानंतर संत कान्होपात्राच्या नवीन रोपट्यांचे रोपण मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते केले जाणार आहे. मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार विठ्ठल सभामंडपात होणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्याचाही सन्मान येथे केला जाणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मंदिरात येणार असून पहाटे साडेचार वाजेपर्यंत हा सर्व कार्यक्रम पार पडणार आहे.
आषाढीला चंद्रभागेत स्नानाला मनाई
सध्याच्या कोरोना संकटामुळे यंदाची आषाढी मर्यादित स्वरूपात साजरी होत असल्याने बाहेरच्या कोणत्याही भाविकाला पंढरपुरात प्रवेश दिलेला नाही. मात्र आषाढी एकादशी दिवशी पंढरपूर मधील भाविकांनाही चंद्रभागेत स्नानाला जाऊ नये यासाठी चंद्रभागेचे सर्व घाट लोखंडी बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आल्याने आता चंद्रभागा बंदिस्त झाली आहे. चंद्रभागेत प्रवेश करणारे सर्व घाट आणि मार्गांवर लोखंडी बरेगेंटिंग लावून मोठा पोलीस बंदोबस्त या घाटांवर ठेवण्यात आला आहे . यामुळे शासनाने परवानगी दिलेल्या 10 मानाच्या पालखी सोहळ्यातील 400 वारकऱ्यांनाच केवळ चंद्रभागेत पादुका स्नानासाठी सोडले जाणार आहे. आषाढी एकादशीला या सर्व पादुकांना चंद्रभागेच्या पात्रता स्नान घालण्याची परंपरा आहे तेवढ्याच वारकर्यांना चंद्रभागेपर्यंत जात येणार आहे.
आषाढी संचारबंदीमुळे आजपासून 8 दिवस एसटी बससेवा बंद
आषाढी एकादशीनिमित्त आजपासून 8 दिवसांची संचारबंदी लागू केल्याने एसटी ची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे . आजपासून 25 जुलैपर्यंत आता एकही एसटी बस पंढरपूर मध्ये येणार नसून एकही बस पंढरपूर मधून बाहेर पडणार नाही. आषाढीला भाविकांनी पंढरपूरला येऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार ही बससेवा बंद करण्यात अली असून खाजगी वाहतूकही आता पुढील 8 दिवस बंद राहणार आहे. यंदा मानाच्या दहा पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरपूरमध्ये राहणार असल्याने कोणत्याही भाविकाने विठुराया अथवा संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करू नये यासाठी ही खबरदारी घेतल्याने लाल परी धक्क्याला लागल्या आहेत. राज्यातील सर्वात मोठे बस स्टॅन्ड अशी ओळख असलेल्या पंढरपूर बस स्थानकावर सध्या पोलीस आणि इतर विभागातील यात्रा नियोजनासाठी आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गाड्यांचे पार्किंग करण्यात आले आहे .
विठ्ठल मंदिरातील 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी..
आषाढी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या 145 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे निगेटिव्ह अहवाल आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मंदिरामध्ये सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या महापूजेला काही मोजके पुजारी व मंदिर समितीच्या सदस्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान कोरोनाचा कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी मंदिर समितीने कोरोनाचे सर्व नियम पाळून काही निर्बंध घातले आहेत. याचाच एक भाग म्हणून मंदिरातील सर्व 145 कर्मचाऱ्यांसह अधिकारी व मंदिर समितीच्या सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्या,पुजारी, कर्मचारी व मंदिर समिती सदस्यांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.