एक्स्प्लोर
पालघर हत्याकांड | चार ड्रोनच्या माध्यमातून जंगलात फरार झालेल्या आरोपींचा शोध
पालघरमध्ये चोर असल्याचं समजून जमावाकडून दोन साधूंसह तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती.पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. आता सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे.
पालघर : पालघरमध्ये घडलेल्या हत्याकांडाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील 110 जणांना अटक झाली असली तरीही 200 ते 300 जण अजूनही जंगलात फरार आहेत. या ठिकाणी जंगल घनदाट असल्याने शोध मोठं आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी आता चार ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. पालघरच्या डहाणू तालक्यात कासा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गडचिंचले गावात दोन साधू आणि वाहनचालकाची चोर असल्याच्या गैरसमजातून गावकऱ्यांनी हत्या केली होती. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध आता ड्रोनच्या मदतीने घेतला जाणार आहे.
आठवड्यातील तिसरा प्रकार उघड
चोर फिरत असल्याच्या अफवांना पालघर जिल्ह्यात पेव फुटले आहेत. याच अफवेतून प्रवाशांची कार अडवून मारहाणीचा प्रयत्न करण्याचा तिसरा प्रकार उघड झाला आहे. डहाणू कोसबाड रोडवरील वाकी मुसळपाडा जवळ वाकीहून डहाणूकडे जाणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची गाडी अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मात्र वेळीच घटनास्थळी घोलवड पोलिस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. बुधवार 15 तारखेच्या रात्री नऊ वाजताची ही घटना असल्याची घोलवड पोलिसांची माहिती आहे.
साधूंसह तिघांची हत्या
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 110 हल्लेखोरांना ताब्यात घेतल असून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावाला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. पालघर पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व दोनशे पोलिस कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. या प्रकारात अजूनपर्यंत 110 ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न व इतर कलमे लावण्यात आली आहेत.
#मुख्यमंत्री काय म्हणाले...
पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील आरोपींना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेय. काही जण या घटनेवरून सोशल मिडीयाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयतन करीत आहे मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलंय. हा हल्ला गेल्या काही दिवसांपासून त्या भागात पसरलेल्या अफवेमुळे गैरसमजुतीने झाला. महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय तातडीने याठिकाणी धाव घेतली आणि दिवसभरात 100 पेक्षा जास्त लोकांना पकडले. त्यात 9 अल्पवयीन मुले असून त्यांना रिमांड होम मध्ये पाठवण्यात आले आहे. उर्वरित हल्लेखोर तुरुंगात असून अतिशय कठोर कारवाई करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी कुठलाही धार्मिक संदर्भ नाही तसेच जातीय वळण देणे अतिशय चुकीचे आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना चोर, दरोडेखोर व मुत्रपिंड काढण्यासाठी नागरिक वेशांतर करून येत असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पसरली आहे. परिणामी अंधार झाला की अनेक गावांमध्ये स्थानिक मंडळी बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांना थांबून जाब विचारणे व वेळप्रसंगी मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कायदा हातात घेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
शिक्षण
पुणे
Advertisement