Osmanabad Red Alert: उस्मानाबाद जिल्ह्याला आज, उद्या रेड अलर्ट; सतर्कता बाळगण्याचा इशारा
Osmanabad Red Alert : बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची शक्यता आहे.
Osmanabad Red Alert : पावसाळा (Rain) सुरु होऊन दीड महिना उलटला असताना, उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात अजूनही सर्वदूर असा जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशात आता पुढील दोन-तीन दिवसांत उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांत जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची शक्यता आहे. तर आज सरासरी 30 मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असून, जुलै महिन्याचा अर्धा महिना उलटल्यानंतर आता कुठेतरी चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. यामुळे पेरण्याही दीर्घकाळ खोळंबल्या होत्या. जुलै महिना सुरु झाल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यातच मागे काही प्रमाणात झालेल्या पावसामुळे ओलावा तयार झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाचा खंड पडल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. यातच आता हवामान विभागाने उस्मानाबाद जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारच्या दिवशी संपूर्ण जिल्हाभरात सरासरी 30 मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
उद्याही रेड अलर्ट
आज (19 जुलै) रोजी रेड अलर्ट देण्यात आला असून, उद्याही उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 20 जुलै रोजीही सरासरी 15 मिलीमीटर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पण या दोन दिवसानंतर पावसाचा जोर पुढील काही दिवस ओसरत जाईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.
तेरणा मध्यम प्रकल्पात केवळ 27.60 टक्के पाणीसाठा
यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात जुलै महिना अर्धा संपत आला असताना जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे याचे परिणाम शेतीप्रमाणे पिण्याच्या पाण्यावर देखील होताना दिसत आहे. कारण जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट होत आहे. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्पातही केवळ 27.60 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर सध्या या धरणात 25.180 दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आगामी काळात जोरदार पाऊस न झाल्यास पाणीप्रश्न गंभीर बनू शकतो.
इतर महत्वाच्या बातम्या: