नांदेड IDBI बँकेवरील ऑनलाईन दरोडा | पोलिसांना मोठं यश; भारतासह युगांडा, झांबिया, केनियामधून 13 जण अटकेत
नांदेडमधील वाजिराबाद येथील आयडीबीआय बँकेत चौदा कोटी रुपयाचा ऑनलाईन दरोडा पडला होता. यात हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल साडे चौदा कोटीच्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारला होता. या प्रकरणात पोलिसांनी भारतासह परदेशातील 13 जणांना अटक करण्यात आली आहे.
नांदेड : नांदेडमधील आयडीबीआय बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील 14 कोटी 50 लाख रुपयांच्या ऑनलाईन दरोड्याप्रकरणी आज नांदेड पोलिसांना मोठं यश आलं आहे. पोलिसांनी एकूण 13 जणांना अटक केली असून या दोन महिलांचा समावेश आहे. हे आरोपी मुंबई, कोल्हापूर, दिल्लीसह युगांडा, झांबिया आणि केनियामधील आहेत.
6 जानेवारी रोजी आयडीबीआय बँकेवर ऑनलाईन दरोडा पडला होता. या बँकेत खातं असलेल्या शंकर नागरी बँकेच्या खात्यावरुन जवळपास साडेचौदा कोटींची रक्कम वळती करण्यात आली. विशेष म्हणजे चोरट्यांनी ही सर्व रक्कम RTGS आणि NEFT माध्यमातून काढल्याचं समोर आलं होतं. यानंतर सहा दिवसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
आता जवळपास महिन्याभराने पोलिसांना मोठं यश आलं आहे. आरोपींनी 287 अकाऊंटमधून ही रक्कम लंपास केली होते. पोलिसांनी आतापर्यंत मुंबई, दिल्ली, कोल्हापूरसह युगांडा, झांबिया आणि केनियातील 13 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सव्वा कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आणखी आरोपींना अटक करण्याच्या दृष्टीने तपास सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या