नांदेडमधल्या IDBI बँकेवरील साडेचौदा कोटींच्या ऑनलाईन दरोड्याप्रकरणी सहा दिवसांनी गुन्हा!
नांदेडमधील वाजिराबाद येथील आयडीबीआय बँकेत चौदा कोटी रुपयाचा ऑनलाईन दरोडा पडला होता. यात हॅकरने IDBI बँकेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यातील तब्बल साडे चौदा कोटीच्या रकमेवर RTGS द्वारे डल्ला मारला होता. या घटनेच्या सहा दिवसांनी आता गुन्ह्याची नोंद झाली आहे.
नांदेड : नांदेडमध्ये हॅकरने 14 कोटी 46 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी अखेर आज (12 जानेवारी) वाजिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीत हॅकरने IDBI बँकेच्या शाखेतील शंकर नागरी बँकेच्या खात्यावरुन तब्बल 14 कोटी 46 लाख रुपये वेगवेगळ्या 289 खात्यात वर्ग केल्याचे निष्पन्न झाले आहे. तब्बल सहा दिवसांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. याविषयी नांदेड येथील पोलीस तपास यंत्रणेचे पथक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती एसआयटी प्रमुख पोलीस उपअधीक्षकविक्रांत गायकवाड यांनी दिली.
6 जानेवारी रोजी आयडीबीआय बँकेवर ऑनलाईन दरोडा पडला. या बँकेत खातं असलेल्या शंकर नागरी बँकेच्या खात्यावरुन जवळपास साडेचौदा कोटींची रक्कम वळती करण्यात आली. विशेष म्हणजे चोरट्यांनी ही सर्व रक्कम RTGS आणि NEFT माध्यमातून काढल्याचं समोर आलं आहे. याविषयी शंकर नागरी बँकेचे सीईओ व्ही डी राजे यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, "हॅकरने बँकेच्या खात्यातील 14 कोटी रुपये NEFT आणि RTGS ने आपल्या खात्यावर वळवले." या प्रकरणी शंकर नागरी बॅंकेकडून शिवाजीनगर पोलिसात लेखी तक्रार देण्यात आली होती, मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता.
या दरोड्यात बँकेच्या खात्यामधून गेलेली रक्कम ही दिल्ली, नोएडामधली 289 खात्यांवर गेल्याची माहिती शंकर नागरी बँकेचे संचालक आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेरील बँकेच्या खात्यात पैसे जात असताना IDBI बँकेने त्याची तपासणी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करुन या घटनेत IDBI बँकच जबाबदार असल्याचं ओमप्रकाश पोकर्णा म्हणाले.