आझाद हिंद सेनेची भारतात एन्ट्री, इंडोनेशियात तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण अन् अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान; आज इतिहासात
On This Day In History : अटल बिहारी वाजपेयींचे 13 महिने चाललेल्या सरकारचा शपथविधी 19 मार्च 1998 रोजी झाला. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळालं.
मुंबई : भारत आणि बांग्लादेशच्या मैत्रीसंबंधामध्ये आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. इतिहासात आजच्या दिवशी म्हणजे 19 मार्च 1972 रोजी या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक असा मैत्री करार झाला होता. त्यानंतर या दोन देशांमध्ये परस्पर सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले होते. मैत्री आणि शांततेसोबतच कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याला चालना देण्याचे वचनही दोन्ही देशांनी एकमेकांना दिले. तसेच भारतीय राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असून आजच्याच दिवशी इतिहासात अटल बिहारी वाजपेयी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 19 मार्च या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे आहे,
1279: चीनच्या सोंग राजवंशाचा अंत
चीनच्या राजकीय इतिहासात आजच्या दिवशी एक महत्त्वाची घटना घडली. 19 मार्च 1279 रोजी मंगोल लोकांनी चीनमधील सोंग राजवंशाचा अंत केला.
1920: अमेरिकन सिनेटने व्हर्साय करार नाकारला
दुसऱ्या महायु्द्धाची बीजे ज्यामध्ये रोवली गेली होती तो व्हर्सायाचा करार (Treaty of Versailles) 19 मार्च 1920 रोजी अमेरिकेच्या सीनेटने नाकारला. पहिल्या महायुद्धामध्ये फ्रान्स आणि ब्रिटन या विजेत्या राष्ट्रांनी जर्मनीवर हा करार लादला होता. व्हर्सायच्या तहावर 28 जून 1919 रोजी स्वाक्षरी झाली आणि जर्मनी आणि मित्र राष्ट्रांमधील युद्ध अधिकृतपणे संपुष्टात आले. या तहान्वये पहिल्या महायुद्धासाठी जर्मनीला दोषी ठरवले आणि जर्मनीवर अनेक अपमानादास्पद अटी लादल्या.
व्हर्सायच्या तहातील अटींमध्ये एक अट अशी होती की जर्मनीच्या ताब्यातील सार प्रांत पंधरा वर्षांसाठी फ्रान्सला द्यावा, तसेच ऱ्हाइन नदीलगतच्या पन्नास किलोमीटर प्रदेशात जर्मनीने लष्कर ठेऊ नये. या तहाप्रमाणे जर्मनीला शिक्षा म्हणून प्रंचड पैसा दोस्त राष्ट्रांना द्यावा लागला तसेच लष्करी, आर्थिक नुकसान सोसावे लागले. याचा परिणाम म्हणून जर्मनीत पुढील काळात प्रंचड आर्थिक मंदी आली. अपमानास्पद भावनांमुळे आपोआपच दुसऱ्या महायुद्धाची बीजे या तहात रोवली गेली.
1944: आझाद हिंद सेनेने भारताच्या भूमीवर पाऊल ठेवलं
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhas Chandra Bose) आणि त्यांचे बंधू रासबिहारी बोस यांनी जपान आणि जर्मनीशी हातमिळवणी केली आणि आझाद हिंद सेनेची ( Azad Hind Sena) स्थापना केली. आझाद हिंद सेनेने जपानी (Japan) लष्कराच्या मदतीने ईशान्य भारतामध्ये म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवर पाऊल ठेवलं. 19 मार्च 1944 रोजी आझाद हिंद सेनेने ईशान्य भारतातील मुख्य भूभागावर राष्ट्रध्वज फडकवला.
1965: इंडोनेशियातील सर्व विदेशी तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण
सप्टेंबर 1963 ते डिसेंबर 1965 या 28 महिन्यांच्या कालावधीत इंडोनेशियामधील (Indonesia) विदेशी असलेल्या 90 कंपन्या इंडोनेशियन सरकारने ताब्यात घेतल्या. त्यामध्ये 19 मार्च 1965 रोजी इंडोनेशियातील सुकार्णो सरकारने विदेशी तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मे 1965 मध्ये इंडोनेशियामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीवर कायद्याने बंदी घालण्यात आली.
इंडोनेशियाचे तत्कालीन प्रमुख सुकार्णो (Sukarno) हे अलिप्ततावादी देशांचे प्रमुख नेते होते. भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासोबत त्यांनी अलिप्ततावादी देशांची संघटना स्थापन केली होती. त्यांच्यावर समाजवादी विचारांचा पगडा असल्याने त्यांनी इंडोनेशियातील सर्व तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेतला.
1972: भारत आणि बांगलादेश यांच्यात 25 वर्षांचा शांतता आणि मैत्री करार
बांग्लादेशच्या स्वातंत्र्यामध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारतीय सैन्याच्या मदतीने बांग्लादेशने पाकिस्तानपासून वेगळं होतं स्वातंत्र्य घोषित केलं. त्यानंतर 19 मार्च 1972 रोजी या दोन देशांदरम्यान ऐतिहासिक असा मैत्री आणि शांतता करार (India–Bangladesh Treaty of Friendship) करण्यात आला. मैत्री आणि शांततेसोबतच कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याला चालना देण्याचे वचनही दोन्ही देशांनी एकमेकांना दिले.
1982: प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसैनिक जे. बी. कृपलानी यांचे निधन
जीवतराम भगवानदास कृपलानी म्हणजेच जे.बी. कृपलानी (J. B. Kripalani) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गांधीवादी समाजवादी, पर्यावरणवादी आणि राजकारणी होते. त्यांना आदराने आचार्य कृपलानी म्हणत. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. कृपलानी यांनी 1977 मध्ये जनता सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कृपलानी यांनी गांधीवादी विचारसरणीवर अनेक पुस्तके लिहिली. 19 मार्च 1982 रोजी त्यांचे निधन झालं.
1998: केरळचे पहिले मुख्यमंत्री नंबूदिरीपाद यांचे निधन
प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते आणि केरळचे (Kerala) पहिले मुख्यमंत्री नंबूदिरीपाद (EMS Namboodiripad) यांचे 19 मार्च 1998 रोजी निधन झालं. केरळचे ईलमकुलम मनक्कल शंकरन नंबूदिरीपाद हे जगातील लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या डाव्या मार्क्सवादी पक्षाचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी डाव्या पक्षांमध्ये लोकशाही आत्मा जिवंत ठेवण्याचं आणि चळवळीला प्रेरणा देण्याचं महत्त्वाचं कार्य केलं. त्यांच्यामुळेच केरळ हे भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य बनलं.
नंबुदिरीपाद हे भारतीय कम्युनिस्ट चळवळीतील सर्वोत्कृष्ट नेत्यांपैकी एक, देशातील अग्रगण्य मार्क्सवादी विचारवंत आणि आधुनिक केरळचे शिल्पकार होते. तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र आणि राजकारण अशा विविध विषयांतील नव्वदहून अधिक उल्लेखनीय पुस्तकांचे लेखन असं त्यांचं योगदान आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील 'ऐक्य केरळ' मोहिमेमुळे मल्याळम भाषकांच्या केरळची निर्मिती झाली. ते केरळचे पहिले मुख्यमंत्री आणि देशातील पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री होते. आज केरळ हे देशातील सर्वात साक्षर आणि जागरूक राज्य आहे. त्याचे श्रेय नंबूदिरीपाद यांना जातं.
1998: अटलबिहारी वाजपेयी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली
अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी 19 मार्च 1998 रोजी देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. वाजपेयींचे हे सरकार 13 महिने टिकलं. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत मिळालं आणि ते पुन्हा पंतप्रधान झाले. वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ नेते होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचे सदस्य होते. पंतप्रधानपदाचा पाच वर्षाचा पूर्ण कार्यकाळ (1999 ते 2004) भूषवणारे ते पहिले काँग्रेसत्तर पंतप्रधान ठरले. ते एक प्रसिद्ध कवी आणि लेखकही होते
2005: पाकिस्तानची शाहीन-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
पाकिस्तानने 19 मार्च 2005 रोजी शाहीन (Shaheen-II) या मिसाईलची चाचणी केली. शाहीन-2 किंवा हत्फ-6 हे जमिनीवर आधारित सुपरसॉनिक आणि लहान-ते मध्यम श्रेणीच्या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे बॅलिस्टिक मिसाईल आहे.
2008: संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेच्या विस्ताराचा मसुदा स्वीकारला
19 मार्च 2008 रोजी भारतासह बहुतेक देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (United Nations Security Council) विस्तारावरील नवीन मसुदा नाकारला.
2020: कोरोनामुळे देशात चौथ्या मृत्यूची नोंद
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामुळे 19 मार्च 2020 रोजी देशात चौथ्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामारीच्या परिस्थितीबाबत देशाला संबोधित करताना 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते.