बालविवाह थांबवायला आलेले अधिकारी पाहून भीतीपोटी पाहुणे मंडळींचं उड्या मारून पलायन, नवरा मुलगाही पसार
कोरोना काळात विवाह सोहळ्यात मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवू नये असे निर्देश असतानाही काही ठिकाणी या निर्बंधांचं सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.
यवतमाळ : कोरोना काळात विवाह सोहळ्यात मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवू नये असे निर्देश असतानाही काही ठिकाणी या निर्बंधांचं सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. अशीच काहीशी घटना घडली आहे, यवतमाळमधील घाटंजी तालुक्यातील पंगडी येथे. या ठिकाणी बेकायदेशीररित्या अल्पवयीन बालिकेचा विवाह सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं.
घाटंजी येथील तहसीलदार पूजा मातोडे तसेच पोलीस आणि बाल संरक्षण विभागाचे कर्मचारी तो बालविवाह थांबविण्यासाठी गेले असता त्या लग्न सोहळ्यात 120 पेक्षा अधिक पाहुणे मंडळी लग्नकार्यात उपस्थित असल्याची बाब लक्षात आली. घाटंजी तहसीलदार तसेच पोलीस व बाल संरक्षण अधिकारी दिसताच तिथं उपस्थित अनेकांचीच तारांबळ उडाली. मुलीच्या आई वडिलांनी मुलीला घेऊन स्टेजच्या मागील भागातून रात्रीच्या अंधारात येथून पळ काढला. तर, मुलासह त्याचे वडीलही तेथून पसार झाले.
अधिकारी आल्याने कारवाई होणार या भीतीपोटी तेथील वीजपुरवठासुद्धा नातलगांनी खंडित करून विवाहस्थळाहून उड्या मारून लग्न कार्यातून पोबारा केला. तर पोलीस आणि आलेल्या अधिकारी यांची दिशाभूल करण्यासाठी नवरदेवाच्या नातलगांनी नवरदेवसारख्या दिसणाऱ्या एका नातलगांला तात्काळ स्वागत समारंभाच्या स्टेजवर तेथील अविवाहित मुलीसह उभे केले होते. 17 वर्षे 9 महिने इतकं वय असणाऱ्या या मुलीचा विवाह 4 दिवसांपूर्वी हा तिच्या नेर तालुक्यातील गावात होणार होता. मात्र, विवाह बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी मुलीच्या आई वडिलांचे हमीपत्र देत बालविवाह करणार नाही असे सांगितले आणि तेथून पुढे 4 दिवसांनी नवरदेवाच्या पंगडी या गावात त्या मुलीचा बळजबरीने विवाह लावण्याचा प्रयत्न केला होता.
हा विवाहसोहळा पंगडी या गावात होत असल्याचं लक्षात येताच अधिकाऱ्यांनी थेट त्या ठिकाणी पोहोचून कारवाई केली आणि 5 लोकांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये मुलगा आणि मुलीचे आईवडील आणि खुद्द नवरदेवाचाही समावेश.
कोरोना काळात धुम्रपानावर तात्पुरती बंदी घालण्याचा विचार आहे का? हायकोर्टाचा सवाल
समाजातून काही चालीरिती बऱ्याच वर्षांपासून लयास गेल्या आहेत. पण, अद्यापही काही भागांमध्ये मात्र याला अपवाद असणाऱ्या घटना घडत आहेत. यंत्रणांना सुगावा लागताच त्यांना वास्तव काही वेगळंच असल्याचं भासवत पुन्हा चुकीच्याच परंपरांच्या आहारी काहीजण केल्याचं काही भागांत पाहायला मिळत आहे. यवतमाळमधील ही घटना त्याचंच एक उदाहरण ठरत आहे.