सोमवारपासून शाळा सुरू होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही : आदित्य ठाकरे
पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
आज राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या प्रश्नसंचाचे एक सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी या प्रकरणाची माहिती घेत आहे. जर या प्रकरणात काय चूक असेल तर योग्य कारवाई करण्यात येईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरून विरोधकांकडून सतत टीका होत आहे. यावर बोलताना आपण विरोधाकांकडे लक्ष न देता काम करत राहावे. जनता मुख्यमंत्र्यांसोबत आणि आमच्या सोबत ठामपणे उभी आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत एकदम ठीक आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना ऍक्शनमध्ये पाहू, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
वैतरणा जलाशयावर 100 मेगावॅट अक्षय ऊर्जानिर्मिती होणार आहे. मुंबईसाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. वीज निर्मिती केंद्र आणि धरण असलेली मुंबई ही देशातील एकमेव महापालिका असेल. या धरणासाठी 20 मेगावॅट हायडल प्लांट आणि 80 मेगावॅट फ्लोटिंग सोलारचा प्रयोग करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या