विकास कामात कुणीही अडथळे आणू नये, नितीन गडकरींच्या पत्रासंदर्भात अजित पवारांचं भाष्य
रस्त्यांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अनेक कामं सुरु आहेत. मात्र या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हे लोकप्रतिनिधी नियमबाह्य मागण्या करत अधिकारी आणि कंत्राटदारांना काम करण्यापासून रोखत असल्याचंही गडकरींनी या पत्रात म्हटलंय. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामे मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल, महाराष्ट्र जनतेचे नुकसान होईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
अजित पवार यांनी म्हटलं आहे की, नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावे लागेल. मागील तीस वर्षापासून मी समाजकारणात काम करतोय, त्यामुळे मी नेहमी सांगतो की हा पैसा जनतेचा असतो.. जनतेच्या पैशाचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे, होणाऱ्या कामाचा दर्जा राखला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला राखला जात नसेल तर संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जर एखादा ठेकेदार चांगले काम करत असतानाही काही जण एखाद्या राजकीय पक्षाचा आधार घेऊन, मिळालेल्या पदाचा आधार घेऊन जर त्रास देत असेल तर तो ही त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे.
नितीन गडकरींचं पत्र कुणाच्या दबावाखाली? नाना पटोले यांचा सवाल, तर बच्चू कडू म्हणाले...
मुख्यमंत्री बारकाईने लक्ष घालतील आणि शहानिशा करतील
अजित पवार म्हणाले की, मागील पावणेदोन वर्षांपासून मी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत काम करतोय. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे.. कामाचा दर्जा चांगला राखण्यासाठी त्यांचा नेहमी कटाक्ष असतो असतो. अधिकाऱ्यांची बैठक होते, तेव्हाही कामाचा दर्जा आणि वृक्षतोड कसे टाळता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात ते बारकाईने लक्ष घालतील त्याची शहानिशा करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे. परंतु कुठल्याही कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करता कामा नये, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Chhagan Bhujbal महामार्गाच्या कामात अडचणी येत असल्यास सोडवू,भुजबळांची गडकरींच्या पत्रावर प्रतिक्रिया
काय म्हणाले होते नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्हयात हे प्रामुख्याने घडते आहे.