Sugar Production : साखरेचं उत्पादन कमी करा, ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी शेती करा, नितीन गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन
साखरेचं अतिउत्पादन (Sugar Production) ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं.
Sugar Production : देशातील साखरेचं अतिउत्पादन (Sugar Production) ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या असल्याचे मत केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. आपण पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी दरवर्षी 15 लाख कोटी रुपये खर्च करतो. त्यामुळं ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्राला पूरक ठरणारी कृषी उत्पादने घ्यायला हवीत. कृषी क्षेत्रामध्ये तशी विविधता आणण्याची गरज असल्याचं देखील गडकरींनी यावेळी सांगितलं. मुंबईत राष्ट्रीय सहनिर्मिती पुरस्कार 2022 वितरण गडकरींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांनी केवळ अन्न उत्पादकच नव्हे तर ऊर्जा उत्पादकही बनावं
भविष्यात येत असलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं, उद्योग क्षेत्रानं पर्यायी इंधन आणि इंधन निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. आपली 65 ते 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. आपला कृषी विकासदर केवळ 12 ते 13 टक्के आहे. ऊस उद्योग आणि शेतकरी हे आपल्या उद्योगवाढीचे इंजिन आहेत. त्यामुळं उसापासून महसूल वाढवण्यासाठी पुढील वाटचाल सहनिर्मिती असावी. उद्योगाने साखरेचं उत्पादन कमी केले पाहिजे. जास्तीत जास्त सहउत्पादनं, उपउत्पादनं घेतली पाहिजेत, भविष्यातील तंत्रज्ञानाची दृष्टी आत्मसात केली पाहिजे. नेतृत्वबळाच्या आधारावर ज्ञानाचं संपत्तीमध्ये रुपांतर केलं पाहिजे. यामुळं शेतकरी केवळ अन्न उत्पादकच नव्हे तर ऊर्जा उत्पादकही बनतील, असंही गडकरी म्हणाले.
साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा
दरम्यान, यावर्षी आमची साखरेची गरज 280 लाख टन असताना, उत्पादन 360 लाख टनांपेक्षा जास्त आहे. ब्राझीलमधील परिस्थिती पहाता या अतिरिक्त उत्पादनाचा उपयोग केला जाऊ शकतो. मात्र, इथेनॉलची गरज खूप जास्त असल्यानं आपल्याला साखरेपेक्षा इथेनॉल उत्पादनावर भर द्यावा लागेल असे गडकरी म्हणाले. गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीची क्षमता 400 कोटी लिटर इतकी होती. इथेनॉलचं उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही खूप उपाय केले आहेत. बायोइथेनॉल वर चालवल्या जाणार्या पॉवर जनरेटरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून इथेनॉलची गरज भागवण्यासाठी नियोजन करण्याची उद्योगासाठी ही वेळ असल्याचं गडकरी म्हणाले. सरकारने भारतात फ्लेक्स इंजिन सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी गडकरी यांनी उद्योग जगताला दिली. बजाज, हिरो आणि टीव्हीएस यांनी आधीच फ्लेक्स इंजिन बनवायला सुरुवात केली आहे. अनेक कार उत्पादकांनीही फ्लेक्स इंजिनवर चालणारी कार मॉडेल्स बनवण्याचे आश्वासन दिले असल्याचे गडकरींनी सांगितलं.
ऊस कापणी यंत्रे इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करू शकतात
ऊस तोडण्यासाठी कापणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास वाव आहे. कापणी यंत्रे इथेनॉलचा इंधन म्हणून वापर करू शकतात, त्यामुळे अर्थव्यवस्थेतलं एक वर्तुळ पूर्ण होणं शक्य होईल अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली. साखर उद्योगाला अनेक समस्या भेडसावत आहेत. वीज खरेदीचे दर तर्कसंगत करण्याची गरज आहे. काही राज्ये, केंद्र सरकारच्या धोरणानुसार दर देत नाहीत, हे ऊस उद्योग आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसण्याचं एक कारण असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: