Nitesh Rane VIDEO : संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटला, आता दिशा सालियानच्या कुटुंबाचे अश्रू कधी पुसणार? नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल
Santosh Deshmukh Murder Case : खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बीडमधील पैसा आणि सत्तेची मस्ती थांबली पाहिजे असं वक्तव्य केलं.

मुंबई : राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी संतोष देशमुख प्रकरणाची तुलना दिशा सालियान प्रकरणाशी (Disha Salian Case) केली आहे. मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केली. सुप्रिया सुळे आता देशमुख कुटुंबीयांप्रमाणे दिशा सालियान कुटुंबाची भेट घेणार का? सालियान कुटुंबाचे अश्रू पुसायला त्या कधी जाणार? असा सवाल नितेश राणे यांनी केला. सुप्रिया सुळे या 'सिलेक्टेड' चिंता करतात असाही आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. त्यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. त्यानंतर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी देशमुख प्रकरणाची तुलना दिशा सालियान प्रकरणाशी केली.
सुप्रिया सुळे 'सिलेक्टेड' चिंता करतात
नितेश राणे म्हणाले की, "देशमुख कुटुंबीयांचे मारेकरी सापडत नाही तसे दिशा सालियानचे मारेकरीसुद्धा सापडत नाही. सुप्रिया सुळे आता सालियान कुटुंबीयांना जाऊन भेटणार का? दिशा सालियान आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या आई वडिलांचे अश्रू पुसणार का? ताई सिलेक्टेड चिंता करतात."
पैसा आणि सत्तेची मस्ती थांबवा
सुप्रिया सुळेंशी संवाद साधताना संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. संतोष देशमुख यांची पत्नी, मुलगी, भाऊ, आई यांच्याशी सुप्रिया सुळेंनी संवाद साधला. यावेळी कुटुंबीयांनी आपली कैफियत सुप्रिया सुळेंसमोर मांडली. वेळ पडल्यास आम्ही अन्नत्याग करू, पण तुम्ही चिंता करू नका, असा धीर त्यांनी देशमुख कुटुंबीयांना दिला. बीडमधील सत्ता आणि पैशींची मस्ती थांबली पाहिजे, अशा भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या.
सुरेश धसांना टोला
दोन महिने उलटून गेल्यानंतरही मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची राजकीय धार कमी झालेली नाही. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. पण ज्यांच्यावर आरोप केला, त्याच धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं त्यांच्यावर टीका सुरू झाली. त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही लढाई हाती घेण्याची घोषणा केली. सुप्रिया सुळेंनी मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन केलं. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर हे नेतेसुद्धा होते. न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचं त्या म्हणाल्या. तसंच आपण कुणाला भेटणार नाही आणि तडजोड करणार नाही, असा टोला त्यांनी धस यांना लगावला.
देशमुखांना बदनाम करण्याचा पोलिसांचा कट
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीपासूनच वर्दीवर शिंतोडे उडालेल्या पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. त्याचं कारण आहे, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सुप्रिया सुळेंसमोर केलेला धक्कादायक खुलासा. संतोष देशमुखांची हत्या अनैतिक संबंधांतून झाल्याचं भासवण्याचा पोलिसांचा कट होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. देशमुख यांचा मृतदेह कळंबला घेऊन जाण्यात येत होता. तिथं एक महिलाही तयार ठेवण्यात आली होती, पण गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो कट फसला असं गावकऱ्यांनी सांगितलं. वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी त्याला दुजोरा दिला.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

