(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NEET परीक्षेतील मोठा घोटाळा उघडकीला; तामिळनाडूच्या धर्तीवर राज्य सरकार NEET हद्दपार करण्याच्या तयारीत?
NEET: टॉपच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश मिळवून देण्यासाठी डमी विद्यार्थ्यांचा वापर झाला असून त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 50 लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : तामिळनाडू सरकारने त्यांच्या राज्यात NEET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर NEET परीक्षा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फायद्याची आहे का याबाबत राज्य सरकार आढावा घेणार आहे. काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे राज्यातील NEET परीक्षेचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. NEET परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं असून तामिळनाडूतील परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांने आत्महत्याही केल्याची घटना घडली आहे. या परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी बसवून शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
NEET परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचं सीबीआयनेही स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील आरके एज्युकेशन करिअर गाईडन्सचा संचालक परिमल कोटपल्लीवार आणि इतर काही विद्यार्थ्यांना या घोटाळ्याप्रकरणी जबाबदार धरलं असून त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी डमी विद्यार्थी बसवण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
डमी विद्यार्थ्यांच्या मार्फत राज्यातील टॉपच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचा प्रकार घडत आहे. या आधीही असा प्रकार घडल्याची शक्यता असून त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे.
तामिळनाडूतून NEET हद्दपार
NEET परीक्षेच्या आधी तामिळनाडूत एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. ही परीक्षा झाल्यानंतरही एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं. या घटनेचे पडसाद तामिळनाडू विधानसभेत उमटले असून राज्यात नीट परीक्षा नको अशी भूमिका असणारं विधेयक मांडण्यात आलं. तामिळनाडूतील भाजप वगळता इतर राजकीय पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा देत हे विधेयक मंजूर केलं. तामिळनाडूमध्ये आता 12 वीच्या गुणांवर मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Explained : पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार? जाणून घ्या, आकड्यांची गणितं
- Agni 5 : पाकिस्तान, चीनच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'अग्नी 5' ची आज चाचणी, जगाचे भारताकडे लक्ष
- NDAमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टाची कडक भूमिका, यंदाच्या प्रवेश परीक्षेमध्येच महिलांना समाविष्ट करा