थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करा; खासदार डॉ. अमोल कोल्हेंची शासनाकडे मागणी
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख महापुरुषांच्या यादीत नसल्यामुळे नाराज झालेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी याकडे ट्वीट करत सरकाराचं लक्षं वेधलं आहे.
मुंबई : राज्स सरकारच्या वतीने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी तयार केली आहे. परंतु, या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. छत्रपती संभाजी महाराजांची 359 वी जयंती 14 मे रोजी तारखेप्रमाणे साजरी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी याकडे लक्ष वेधलं आहे. तसेच याबाबतीत लक्षं घालून शासनाने त्वरित सुधारणा करावी, असी मागणीही त्यांनी केली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी मंगळवारी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये ते म्हणाले आहेत की, 'महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी.' तसेच या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलला टॅग केलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख महापुरुषांच्या यादीत नसल्यामुळे नाराज झालेल्या डॉ. अमोल कोल्हेंनी याकडे ट्वीट करत सरकाराचं लक्षं वेधलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा नामोल्लेख महापुरुषांच्या दिनविशेष यादीत नसल्याने ते अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असून त्यांनी छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महापुरुषांच्या भूमिका साकारल्या होत्या. अमोल कोल्हे यांच्या दोन्ही भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. तसेच या दोन्ही भूमिका प्रक्षेकांनीही डोक्यावर घेतल्या होत्या.
संबंधित बातम्या :
कोरोना काळात वेगवेगळ्या निकषांमुळं संभ्रम, जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र
लॉकडाऊनमध्ये सदाभाऊ खोतांकडून आंदोलनाची घोषणा, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 15 मे पासून आंदोलन