Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा आजचा युक्तिवाद संपला, पुढील सुनावणी येत्या सोमवारी
NCP Crisis : निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरु असून आजच्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. तर अनेक महत्त्वाचे मुद्दे अजित पवार गटाने मांडले.
नवी दिल्ली : निवडणूक आयोगात (Election Comission) राष्ट्रवादी (NCP) पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी पार पडली असून येत्या सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान 'आमची बाजू न ऐकताच निवडणूक आयोगानं पक्षात वाद असल्याचं म्हटलं, जे आम्हाला अमान्य आहे, असं शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे. दरम्यान या सुनावणीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मनींदर सिंह यांनी युक्तिवाद केला.
तर या सुनावणीदरम्यान विविध मुद्दे दोन्ही गटाकडून मांडण्यात आले. तर शरद पवारांच्या समोरच अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. दरम्यान या सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शरद पवार गटाचे अनेक मु्द्दे स्पष्ट केलं. तर राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांचाच असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.
काय म्हणाले अभिषेक मनू सिंघवी?
अभिषेक मनू सिंघवी यांनी यावेळी बोलताना म्हटलं की, 'आम्ही अजित पवार गटाच्या अनेक मुद्द्यांना विरोध केला. पण निवडणूक आयोगाने हा विरोध ग्राह्य धरला नाही. पण जेव्हा अजित पवार गटाचा युक्तिवाद संपल्यानंतर आमची बाजू ऐकण्यात येईल असं आश्वासन निवडणूक आयोगने आम्हाला दिलं आहे. त्यामुळे त्यांचे मुद्दे मांडून झाल्यानंतर आम्ही युक्तिवाद करु. अनेक खोटे दस्ताऐवज अजित पवार गटाकडून सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा युक्तिवाद करु तेव्हा अनेक पुरावे सादर करु.'
'आमदार, खासदरांची संख्या ग्राह्य धरता येणार नाही'
या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाकडून आमदार आणि खासदारांच्या संख्येचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील आमदार आणि खासदारांचं संख्याबळ सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाची राष्ट्रीय मान्यता रद्द झाल्याने आमदार आणि खासदारांची संख्या महत्त्वाची असल्याचा युक्तिवाद यावेळी अजित पवार गटाने केला. यावर बोलताना अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटलं की, 'सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की, जिथे अपात्रतेची प्रकरणं प्रलंबित आहेत, त्या ठिकाणी आमदार आणि खासदारांची संख्या ग्राह्य धरली जाणार नाहीत. त्यामुळे या मुद्द्यावर निकाल देणं योग्य ठरणार नाही.'
आजच्या युक्तिवादामध्ये कोणते मुद्दे मांडण्यात आले?
निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. यावेळी अनेक मुद्दे त्यांनी मांडले. तर जयंत पाटलांची नियुक्ती देखील बेकायदेशीर असल्याचं यावेळी अजित पवार गटाने म्हटलं. तर यावेळी अजित पवार गटाकडून घटनेचा देखील दाखला देण्यात आला. महाराष्ट्र आणि नागालँडचेही आमदार आमच्या बाजूने असल्याचं यावेळी अजित पवार गटाने म्हटलं. महाराष्ट्र विधानसभेचे 53 पैकी 42, विधानपरिषदेचे 9 पैकी 6 आणि नागालँडमध्ये 7 पैकी 7 असे 55 आमच्या पाठिशी, तर लोकसभेत 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आमच्यासोबत आहे, असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं.