Sharad Pawar : अजितदादा नेमके कुणाचे? राष्ट्रवादीत फूट पडलीय का नाही? शरद पवार-सुप्रिया सुळेंच्या यू टर्नमुळे सगळेच संभ्रमात
Sharad Pawar Vs Ajit Pawar : आधी अजित पवार आमचे नेते असल्याचं शरद पवारांनी म्हटलं, नंतर यावरून यू टर्न घेत तसं म्हटलं नसल्याचं सांगितलं.
मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जी काही वक्तव्य दिली आहे त्यावरून त्या पक्षात नेमकं काय चाललंय याचा अंदाज भल्या-भल्या राजकीय पंडितांनाही देता येत नाही. आधी शरद पवारांचे (Sharad Pawar) वक्तव्य, त्यानंतर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य आणि नंतर दादांचे नो कॉमेंट्स... यावरून कार्यकर्त्यांनाच काय राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही प्रश्न पडलाय दादा, नेमके कुणाचे? अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत की नाहीत? राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे की नाही? शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्यात एकवाक्यता आहे की नाही? हे सगळे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पवार पिता पुत्रीने गेल्या 36 तासांमध्ये केलेली वेगवेगळी वक्तव्ये.
अजित पवार आमचेच नेते, सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
सगळ्यात आधी सुप्रिया सुळे म्हणाल्या... अजितदादा हे आमचे नेतेच आहेत. अजितदादा हे राष्ट्रवादीचेच नेते आहेत असं स्पष्ट आणि लख्ख वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. मग पत्रकारांनी शरद पवारांना बारामतीमध्येच गाठलं आणि सुप्रिया सुळेंच्या मताबद्दल विचारलं. त्यावर शरद पवारांनीही सांगितलं होतं की अजित पवार हे आमचे नेते आहेत.
आता पिता-पुत्रीने, दोघांनीही अजित पवार हे आमचे नेते आहेत असं वक्तव्य केल्यानंतर अजितदादा गटात चैतन्य निर्माण झालं. त्यावर आमच्या दैवताने आम्हाला आशीर्वाद दिले, पवार साहेबांना विकासाला साथ द्यावी असं वाटत असेल असं अजित पवार गटातील काही नेत्यांनी केलं.
पवार आणि ताईंचा यू टर्न
पण शरद पवार बारामतीतून दहिवडीत पोहोचले आणि तिथल्या पत्रकारांनी पवारांना पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. पण इथे मात्र पवारांनी बारामतीत केलेलं वक्तव्य आपलं नसल्याचा दावा केला. शरद पवारांनी अवघ्या सहा तासांमध्ये आपण दिलेल्या उत्तरालाच अव्हेरलं. म्हणून मग माध्यमांनी पुन्हा एकदा पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंना गाठलं. तेव्हा त्यांनी तर आपल्या वक्तव्यावर जे काही स्पष्टीकरण दिलं ते माध्यमांनाही डीकोड करता आलं नाही. आधी ताई म्हणाल्या की, दादा आमचे नेते. मग म्हणाल्या, दादा महाराष्ट्राचे मोठे नेते.
शरद पवारांनी दहीवडीच्या पत्रकार परिषदेत पहाटेच्या शपथविधीचा दाखलाही दिला. अजित पवारांनी भाजपशी केलेली हातमिळवणी पुन्हा होणार नाही अशी ग्वाही दिली होती. पण दादांनी तोच कित्ता पुन्हा गिरवल्याने त्यांचे परतीचे दोर कापून टाकल्याचं पवार म्हणाले.
कधी पवार गट अजितदादा गटाविरोधात न्यायालयात जातो, कधी पवार अजितदादा गटाला फोटो न वापरण्याची ताकीद देतात. तर कधी पवार थेट अजित पवारांची पुण्यामध्ये भेट घेतात. शरद पवार आपल्या फुटीर नेत्यांवर एक चकार शब्द काढत नाहीत आणि सुप्रिया सुळे अजित पवारांना आमचे नेते म्हणून गौरवतात.
दोन्ही पवार गट हे एकच आहेत का? फक्त सत्तेशी सलोखा ठेवण्यासाठी ही पवार काका-पुतण्याची स्ट्रॅटेजी आहे का? बाहेरुन दोन... पण आतून एकच राष्ट्रवादी आहे का? आणि याच दुधारी तलवारीवर चालताना सुप्रिया सुळेंची कोंडी होतेय का? हे प्रश्न मात्र सध्या महाराष्ट्रातील नागरिकांना पडले आहेत.
ही बातमी वाचा :