Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या त्या नऊ आमदार आणि दोन खासदारांवर अपात्रतेची कारवाई करावी; शरद पवार गटाची पत्राद्वारे मागणी
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शरद पवार गटाला जी नोटिस पाठवली आहे त्याला मात्र अद्याप उत्तर देण्यात आलं नाही.
मुंबई: एकीकडे राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी भाजपसोबत जाऊन शपथ घेतली आणि मंत्रीपदं मिळवली तर दुसरीकडे राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नसल्याचं खासदार सुप्रिय सुळे म्हणतात, त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय चाललंय हे लक्षात येत नसताना आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीतील ज्या नऊ आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मंत्रीपदाची शपथ घेतली, आणि ज्या दोन खासदारांनी त्यांना साथ दिली त्यांच्यावर आता कारवाई करावी अशा मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून विधिमंडळाचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींना देण्यात आलं आहे.
अनुसूची 10 प्रमाणे नऊ आमदार आणि दोन खासदारांवरती अपात्रतेची कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. पण त्यांना दिलेल्या नोटिसीला अद्याप उत्तर दिलेलं नाही.
पक्षाच्या वतीने अजित पवार गटाने शरद पवार गटाला एक नोटिस पाठवली होती. त्यावर अद्याप शरद पवार गटाकडून उत्तर देण्यात आलं नाही. पण यासाठी किती कालावधी लागू शकतो याची कल्पना नाही, त्यामुळे या आमदारांवर कारवाई सुरू करा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे.
परत संधी द्यायची नसते, मागायचीही नसते
अजित पवारांबद्दल शरद पवार यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलंय. एखादा मोठा गट फुटला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याला फूट म्हणता येणार नाही. पहाटे शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली होती, आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची देखील नसते, असं शरद पवार म्हणाले. तर अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन पवारांनी यू-टर्न घेतला.
अजित पवार आमचे नेते आहेत, असं मी म्हणालो नाही, 'सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे बहीण-भाऊ आहेत त्याअर्थी ते वक्तव्य होतं, याचा राजकीय अर्थ काढू नका असंही स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं आहे.
शरद पवारांच्या या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. नो कॉमेंट्स एवढेच शब्द वापरत त्यांनी बोलणं टाळलंय.
शरद पवार कोल्हापुरात येत असताना मी नाही, असं 40 वर्षांत प्रथमच होतंय अशी प्रतिक्रिया पवारांच्या कोल्हापूरमधील सभेवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
ही बातमी वाचा: