Nawab Malik Arrested : मलिक कुटुंबियांचे ED वर गंभीर आरोप, रिमांड कॉपीत म्हटले 'महसूल मंत्री'
मलिकांची कन्या निलोफर मलिक यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.
Nawab Malik Arrested : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांच्यावर काल ईडीने (ED) कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या अटकेच्या कारवाईचा निषेध केला. दरम्यान, नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत, ED च्या रिमांड कॉपीत मलिकांबाबत चुकीची माहिती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मलिकांची मुलगी निलोफर मलिक यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान निलोफर मलिक आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी ही माहिती दिलीय. काय म्हणाल्या निलोफर?
रिमांड काॅपीत मलिकांना महसूल मंत्री म्हटले - निलोफर मलिक
नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर म्हणाल्या, भाजपाकडून मुद्दाम त्रास दिला जातोय. मागील काही दिवस खूप चर्चा होती की ईडीकडून आम्हाला त्रास होणार. आणि शेवटी नवाब मलिक यांना ही ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले आणि तिथे अटक केली. मात्र ईडीच्या रिमांड कॉपीत नवाब मलिकांना यात महसूल मंत्री म्हटले आहे. केंद्रीय यंत्रणेकडून चुकीची आणि खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप निलोफर यांनी केलाय. निलोफर पुढे म्हणाल्या, आम्ही जमीन खरेदी केली पण त्यात ज्या पद्धतीने चित्र निर्माण केले जे चुकीचे आहे, यावर लवकरच कागदपत्र दाखवू. अटक करण्यापूर्वी माझ्या कुटुंबियांसोबत कोणीही पोलिस चर्चा केली नाही. ईडी अधिकारी थेट मलिक यांना घेऊन गेले.
प्रत्येक मुसलमान व्यक्तीचा अंडरवर्ल्डशी संबंध असतो का?
केंद्रीय यंत्रणांचा पर्दाफाश माझे वडिल करत होते, त्यामुळे मी सुद्धा मुलगी म्हणून वडिलांची साथ देऊन यामागील सत्य लवकरच समोर आणेल. प्रत्येक मुस्लीम अंडरवर्ल्डशी जोडलेला असतो का? कोर्टात ईडी खोटे आणि चुकीचे आरोप करते. पण त्यांच्याकडे पुरावे नाहीत. पण लवकरच सत्य समोर येईल असे निलोफर म्हणाल्या.
1993 सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी प्रकरणाशी संबंधित
काल पहाटे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या कुर्ला स्थित घरी ईडीची (ED) टीम पोचली आणि त्यानंतर एका प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. ते प्रकरण म्हणजे नवाब मलिकांवर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी त्यांचा संबंध दाऊद गँगशी आहेत आणि त्यांचे तसे व्यवहार देखील झाले आहेत. नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या नवाब मलिक यांच्या घरी काल सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड मारली आणि ही धाड 1993 सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपी यांच्याकडून जमीन खरेदी प्रकरणाशी संबंधित आहे ही माहिती समोर आली.
काय आहे प्रकरण?
- 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली खान आणि हसीना पारकर यांचा जवळचा व्यक्ती सलीम पटेल यांचे नवाब मलिकांशी व्यवसायिक संबंध.
- नवाब मलिक यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला त्या दोघांनी करोडोची जमीन कवडीमोल भावाने विकली.
- कुर्ला येथील एलबीएस रोडला असलेल्या गोवा कंपाऊंड येथील करोडोची साडे तीन एकर जमीन 20 ते 30 लाखात मलिकांच्या नातेवाईकांना दिली.
- दाऊद नंतर हसीना पारकर प्रॉपर्टी खरेदी करत होत्या आणि त्यामधे पावर ऑफ अटरनी सलीम पटेल यांना लावत होत्या. तीच प्रॉपर्टी नवाब मलिक यांच्या नातेवाईकांनी खरेदी केली.
आगामी काळात राज्य सरकार विरूद्ध केंद्रिय तपास यंत्रणा संघर्ष
नवाब मलिक यांच्यावर ज्यावेळी आरोप करण्यात आले होते त्याचवेळी त्यानी आपल्यावरील सर्व आरोप पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावले होते. मात्र ईडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार इकबाल कासकर याला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांचं एका प्रॉपर्टी खरेदी संदर्भात नाव समोर आल्याची माहिती मिळाली आहे. नवाब मलिक यांना इडीने चौकशी साठी नेल्यानंतर राज्यांतील राजकरण मात्र चांगलचं ढवळून निघालं आहे. विरोधकांनी केंद्रीय तपास यंत्रणाचा सरकार चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचं म्हटल आहे तर शरद पवार यांनी थेट याला धार्मिक रंग दिला आहे. केंद्रिय तपास यंत्रणांच्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट ईडीच्या कार्यालात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना तत्काळ रोखल. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आव्हान केलं. केंद्रिय तपास यंत्रणांनी नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. महविकास आघाडीतील नेत्यांनी देखील एकत्र येऊन केंद्रिय तपास यंत्रणांना उघडं पाडण्याचा पवित्रा घेतलाय त्यामुळें आगामी काळात राज्य सरकार विरूद्ध केंद्रिय तपास यंत्रणा हा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Nawab malik: नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी; सत्र न्यायालयाचा निर्णय
- Nawab Malik Arrested : मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ईडीची कारवाई, छगन भुजबळांचा आरोप
- Nawab Malik Arrest: 'मविआशी समोरासमोर लढता येत नसल्याने हे अफझलखानी वार सुरू आहेत,' खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha