Nawab Malik Arrested : मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ईडीची कारवाई, छगन भुजबळांचा आरोप
Nawab Malik Arrested : नवाब मलिकांवर केलेली कारवाईचा निषेध करण्यासाठी गुरूवारी महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयासमोर सकाळी 10 वाजत आंदोलन करणार आहे.
मुंबई : नवाब मलिक (Nawab Malik Arrested) यांना ईडीकडून (ED) आज अटक करण्यात आली. ज्या पद्धतीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली त्याचा महाविकासआघाडी उद्या निषेध करणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता महाविकासआघाडीचे नेते मुंबईत आंदोलन करणार आहे. तर परवापासून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करणार आहे, असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करत महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा विरोधी पक्षाचा डाव असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई
छगन भुजबळ म्हणाले, नवाब मलिक हे विरोधकांविरुद्ध बोलतात म्हणून 30 वर्षापूर्वीच्या प्रकरणात मलिकांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा हा विरोधकांचा डाव आहे. मंत्र्याचे खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न आहे. मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करत या पद्धतीने कारवाई करणे हे लोकशाहीला शोभा न देणारे हे वागणे आहे. ज्या वेळी हे प्रकरण घडले त्यावेळी पीएमलए कायदा अस्तित्वात नव्हता.
मलिकांचा राजीनामा घेणार नाही
नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येतच नाही. नवाब मलिकांनी कोणतीही चूक केलेली नाही. जोपर्यंत न्यायालयासमोर दोषी आढळत नाही तोपर्यंत राजीनामा घेणार नाही.
अंडरवर्ल्डशी संबंध ठेवणे, त्याच्याशी संबंधित पैशाचा वापर करणे, हा पैसा परदेशात पाठवणाऱ्या कंपनीशी संबंध असणे या आरोपाखाली ईडीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. वाब मलिक हे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले होते. आता नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानण्यात येतंय. अनिल देशमुख यांच्यानंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ईडी अधिकारी नवाब मलिक यांचे घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, नवाब मलिक यांना समन्स देण्यात आले नव्हते.
काय आहे नेमकं प्रकरण?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आज मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Nawab Malik: नवाब मलिकांच्या पाठिशी राष्ट्रवादी ठाम, मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचा निर्णय
Nawab Malik Arrest: 'मविआशी समोरासमोर लढता येत नसल्याने हे अफझलखानी वार सुरू आहेत,' खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल