Gulmohar Tree : गुलमोहराची झाडं ठरताहेत जीवघेणी, नाशिकमध्ये दोन महिन्यात घेतला तिघांचा जीव
Nashik News Update : गुलमोहराचे वृक्ष नाशिकमध्ये सध्या जीवघेणे ठरत आहेत. या झाडांमुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. नाशिकमध्ये गेल्या सव्वा दोन महिन्यात गुलमोहराचे झाड कोसळल्याने दोन दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय.
नाशिक : गुलमोहराचे झाड कोसळल्याने नाशिकमध्ये गेल्या सव्वा दोन महिन्यात दोन दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झालाय. या झाडांमुळे अनेक अपघातही सातत्याने होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. गुलमोहराचे झाड रिक्षावर कोसळल्यामुळे रिक्षा चालकासह प्रवाशी महिलेचा मृत्यू झालाय. नाशिकमधील सातपूर परिसरात काल ही घटना घडलीय. पोपट कृष्णा सोनवणे असे ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर शैला शांतीलाल पटणी असे ठार झालेल्या प्रवासी महिलेचे नाव आहे.
गुलमोहराचं फुल असो किंवा झाड त्याच्याकडे बघताच मन प्रसन्न होतं. पावसाळ्याच्या दिवसात तर गुलमोहराची झाडे अधिक मनमोहक वाटू लागतात. रस्त्यावर या झाडाच्या फुलांचा सडा पडताच जणू रस्त्यांनी लाल लाल गालिचाचं पांघरला आहे की काय असा भास निर्माण होतो. मात्र हिच गुलमोहराचे वृक्ष नाशिकमध्ये सध्या जीवघेणे ठरत आहेत. या झाडांमुळे आजवर अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. 27 एप्रिल 2022 रोजी शहरातील लेखानगर परिसरात चालत्या दुचाकीवर गुलमोहराचे झाड कोसळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच काल ( 11 जून ) गुलमोहराचे झाड रिक्षावर पडल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झालाय.
शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सातपूर परिसरातील आयटीआय सिग्नलजवळून सातपूरकडे एक ऑटोरिक्षा जात असताना रिक्षावर रस्त्याच्या कडेला असलेला भलामोठा गुलमोहराचा वृक्ष कोसळला. या घटनेत रिक्षाचा चक्काचूर झाला. तर रिक्षातील प्रवासी महिला शैला पाटणी आणि रिक्षाचालक पोपट सोनवणे हे यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यू झाला.
या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहोराच्या झाडांचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. शहरात सद्यस्थितीत अंदाजे चाळीस लाखांहून अधिक झाडं आहेत. यात जवळपास साडेपाच हजार झाडं गुलमोहराची आहेत.
गुलमोहराला तनमूळ असतात, रस्त्यामुळे किंवा इतर खोदकामामुळे त्यांचा विस्तार होत नाही. पावसामुळे त्यांची मूळं सैल झाल्याने झाडे उन्मळून पडतात. या झाडांची रचना अशी असते की शेंड्याला पानं असतात आणि त्यांच्या फांद्यांचा विस्तार 50 फुटापर्यंत असतो. मात्र कालांतराने हा भार झाडं सहन करू शकत नाहीत, त्यामुळे ती पडतात. अनेक वेळा वारा पाऊस नसतानाही गुलमोहराचे झाड पडते. ही विदेशी झाडे असून 18 च्या शतकातील सध्या त्याच्या लागवडीला परवानगी नाही. रस्त्याच्या कडेला ही झाडे असणे खूप गंभीर बाब आहे, अशी माहिती पर्यावरणाचे अभ्यासक शेखर गायकवाड यांनी दिली.