Nashik Oxygen Leak : नाशिक ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी आणि धक्कादायक, अमित शाहांपासून नेत्यांनी व्यक्त केली हळहळ
Nashik Oxygen Leak: राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली.
नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
Nashik Hospital Oxygen Leak Live : नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची दुर्देवी घटना, क्षणाक्षणाचे अपडेट
व्हेंटिलेटरवर असलेल्य़ा रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, ही एक खाजगी कंपनीची टाकी आहे. रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्सकरता टॅंकर आला होता. त्यात काही टेक्निशियन्स होते. तो टॅंकर रिफिल करण्यात आला होता, असं आयुक्तांनी सांगितलं, मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळं ही घटना घडली, असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितलं. याबाबत सर्व माहिती शासन स्तरावर माहिती कळवली आहे, असं त्यांनी सांगितलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या शोकसंवेदना
नाशिकमधील ह़ॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीच्या घटनेची बातमी ऐकून सुन्न झालो आहे. ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले त्यांच्या या नुकसानीबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाला प्रार्थना करतो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र शोकमग्न आहे! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.
नाशिक महापालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी - उपमुख्यमंत्री अजित पवार
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या शोकसंवेदना
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
अशी घटना राज्यात दुसरीकडे घडू नये यासाठी काळजी घ्यायला हवी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
नाशिकमधील घटना दुर्देवी आणि खरोखर धक्कादायक आहे. याची कारणं काय आहेत ते समोर येईलच. मात्र आता तिथं जे बाकी पेशंट आहेत. त्यांना मदत केली पाहिजे. पेशंटला शिफ्ट करण्याची गरज असेल तर शिफ्ट करावं. या घटनेची सखोल चौकशी करावी. अशी घटना राज्यात दुसरीकडे घडू नये यासाठी काळजी घ्यायला हवी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे - सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : नाशिकमधील घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे. यात मानवी चूक असेल तर चौकशी करून कारवाई करा, प्रशासन अधिक सुधारण्याची गरज आहे, जो प्राण वाचविणारा घटक आहे त्याचीच गळती म्हणजे गंभीर स्थिती आहे, राज्यात अन्यत्र अशा घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे, प्रशासनाला तांत्रिक चुका टाळण्यासाठी स्पष्ट सूचना देणे गरजेचे आहे, असं भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल-मंत्री बाळासाहेब थोरात
नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रूग्णालयात घडलेल्या दुर्घटनेत 22 रूग्णांना प्राण गमवावे लागले हे अत्यंत वेदनादायी आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. सदर दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मंत्री बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.
सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी - आदित्य ठाकरे
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असं मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.