(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दारु दुकान हटवा मगच सरपंच, उपसरपंच निवडा; नांदेडमधील महिलांचा ग्रामपंचायतीसमोर ठिय्या
दारु दुकान हटवा मगच सरपंच उपसरपंच निवडा, अशी अट घालत नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या दिला. यामुळे आजची सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया तहकूब करुन पुढे ढकलण्यात आली आहे.
नांदेड : गावातील देशी दारुचं दुकान हटवा मगच सरपंत, सरपंच निवडा अशी अट घालत धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण इथल्या संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी या महिलांनी ग्रामपंचायत सदस्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव केला. यामुळे नायगाव ग्रामपंचायतची सरपंच निवडीची सभा तहकूब करुन निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण इथल्या महिलांनी हे अनोखं आंदोलन केलं. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी याच गावच्या महिलांनी संबंधित देशी दारुचं दुकान हटवण्यासाठी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं होतं. कारण नायगाव धरण इथलं देशी दारुचं दुकान चोवीस तास सुरु असतं. परिणामी तेलंगाणातील लोकही याठिकाणी दारु स्वस्त मिळत असल्याने गर्दी करतात. त्यामुळे गावात दारुड्यांचा सतत उच्छाद असतो. तसंच या दारु दुकानामुळे गावातील पुरुष मंडळी तर दारुडी झालीच परंतु चौथीच्या वर्गात शिकणारे कोवळी मुलंही दारुच्या आहारी जाऊन गावभर धिंगाणा घालत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती.
परंतु एवढा सारा आटापिटा करुन आणि लेखी तक्रारी करुनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे अखेर आज या गावातील महिलांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं. यावेळी धर्माबाद पोलीस आणि तहसील प्रशासनाने मध्यस्थी केली. परंतु जोपर्यंत दारुचं दुकान बंद होत नाही तोपर्यंत सरपंच, उपसरपंच निवड होऊ देणार नाही, अशी भूमिका या रणरागिणींनी घेतली. त्यामुळे आजची सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया तहकूब करुन पुढे ढकलण्यात आली आहे.