Nanar Refinery Project: नाणार रिफायनरी प्रकल्पात तक्रारींचा पाऊस; समर्थक अद्यापही आशावादी! काय असेल पुढील कारवाई?
नाणार परिसरातील रिफायनरीच्या जमिन व्यवहारांची चौकशी करून भूमीपुत्रांना त्यांच्या जमिनी परत करण्यासंदर्भात तातडीनं कार्यवाही करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. यामध्ये आता राजापूर तालुक्यातील 14 गावांमधून तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित तेल शुद्धीकरण कारखान्यास वाढता विरोध पाहता हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. दरम्यान, यावेळी जमिन खरेदी - विक्री करताना फसवणूक झाल्याच्या तक्रारी भूमिपुत्रांनी केल्या होत्या. शासन स्तरावरून त्यासंदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राजापूर स्तरावरून हालचाली सुरू झाल्या होत्या. यामध्ये नाणार परिसरातील रिफायनरीच्या जमिन व्यवहारांची चौकशी करून भूमीपुत्रांना त्यांच्या जमिनी परत करण्यासंदर्भात तातडीनं कार्यवाही करण्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्याकरिता 31 मार्च ही तारीख अंतिम होती. दरम्यान, यामध्ये आता राजापूर तालुक्यातील 14 गावांमधून तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.
यामध्ये खरेदी - विक्री व्यवहाराचा चेक बाऊन्स होणे, कुळाच्या परवानगीशिवाय जमिनीचा खरेदी - विक्री व्यवहार, मुखत्यारपत्राचा फायदा घेत संमत्ती न घेता जमिन खरेदी - विक्रीचा व्यवहार, सात - बारामधून नाव कमी केल्याबाबत अशा प्रकारचे 63 तक्रार अर्ज हे उपविभागीय अधिकारी राजापूर यांच्याकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रार अर्ज अर्थात 35 तक्रार अर्ज हे साखर या गावातून प्राप्त झाले आहेत. रद्द झालेल्या नाणार परिसरातील रिफायनरीच्या जमीन व्यवहारांची चौकशी करून भूमीपुत्रांना त्यांच्या जमिनी परत करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात येऊन एक महिन्याच्या आत कृती अहवाल सादर करण्याबाबत शासन स्तरावरून सुचना प्राप्त झाल्या आहेत असं यावेळी काढलेल्या जीआरमध्ये म्हटलं होतं.त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली होती.
काय असेल पुढील दिशा?
दरम्यान, यामध्ये पुढे काय कारवाई करणार? याबाबत 'एबीपी माझा'नं संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळी तक्रार केलेल्या अर्जदारांना याबाबत पुरावे मागितले जातील. त्यांचं म्हणणं किवा तक्रारीनुसार सारी चौकशी केली जाईल' अशी माहिती दिली. जमिन गैरव्यवहारांच्या खरेदीचा विषय पावसाळी अधिवेशनात देखील गाजला होता. यासंदर्भात कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीतर्फे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना निवेदन देखील देण्यात आले होते. शिवाय कणकवलीचे आमदार निलेश राणे यांनी देखील याबाबत आवाज उठवला होता. त्यावेळी नाना पटोले यांनी देखील जमिनिच्या खरेदी व्यवहारांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
नाणारबाबत समर्थक अद्याप देखील आशावादी!
राज्य सरकारनं नाणार येथील प्रकल्प रद्द केला आहे. पण, असं असलं तरी हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील प्रस्तावित ठिकाणी व्हावा याकरता सध्या समर्थक अद्याप देखील आशावादी आहेत. त्याकरता त्यांनी राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. शिवाय, शरद पवार यांची भेट घेण्यासाठी देखील त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. पण, यासाऱ्यामध्ये विरोधकांनी आमचा विरोध कायम असून लढा तीव्र करू असा इशारा दिला आहे.