(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरसंघचालकांचं महत्वाचं वक्तव्य; म्हणाले, 'मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले हा आपला इतिहास'
RSS Mohan Bhagwat : आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
Nagpur News: सरसंघचालक मोहन भागवत (RSS Mohan Bhagwat) यांनी भारताच्या इतिहासात अनेक शतके चाललेल्या सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता संदर्भात अत्यंत महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज आपण हे नाकारण्यात अर्थ नाही की आपण मानवतेची मान शरमेने खाली जाईल अशा स्वरूपात आपल्याच लोकांना वागवले आणि हा इतिहास आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नागपुरात "वज्रसूची टंक" या पुस्तकाच्या प्रकाशनच्या वेळी विदर्भ संशोधन मंडळाच्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी मोहन भागवत म्हणाले की जेनेटिक्स (अनुवांशिकता) प्रमाणे आजपासून 80 ते 90 पिढ्यांपूर्वी भारतातल्या सगळ्या जातींमध्ये आंतरजातीय विवाह होत होते. मात्र, 80 ते 90 पिढ्यांच्या पूर्वी हळू हळू त्यावर बंधने येऊ लागली आणि त्यामुळे लोकांचा आपापसात मिसळणं बंद झालं. लोकं चौकटीत, भिंतीत कैद झाले, असं भागवत म्हणाले.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, हा सर्व काळ अनेक दशके चाललेल्या गुप्त साम्राज्याचा होता. त्यामुळे जर एखादा समूह, एखादी जात किंवा पंथ किंवा एखादी पार्टी फार काळ सत्तेत राहिली तर समाजात त्याचे शत्रू तयार होतात. विरोधात प्रतिक्रिया होते. आज आपण त्याला इन्कम्बन्सी ( नाराजी ) म्हणतो. मात्र, इन्कम्बन्सी किंवा विरोध आपोआप निर्माण झाले तर ते तेवढे जहाल नसते. मात्र जर कोणी सत्तेत राहण्याचा गैरफायदा घेऊन काही केलं असेल तर ती प्रतिक्रिया रागाची असते, क्रोधाची असते आणि भारतात सामाजिक विषमतेबद्दल तसेच झाले असे भागवत म्हणाले.
ज्यामुळं भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे
ते म्हणाले की, एवढ्यावरच थांबले नाही, तर वर्ण आणि जाती व्यवस्थेबद्दल आज दिले जाणारे तर्क आणि भारतात आधी सामाजिक विषमता नव्हती असे दावे बोलण्यासाठी ठीक आहे, मात्र आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जाती बद्दल काय?तर समाजाच्या हिताचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने हेच उत्तर द्यावे आणि दिलेच पाहिजे की तो भारताचा एक भूतकाळ होता, आता तो विसरून जा. कारण ज्या ज्या गोष्टीमुळे भारतीय समाजात विषमता निर्माण झाली होती, त्या सर्व गोष्टी कायमच्या दूर केल्या पाहिजे आणि हे आधीच आपण केल्या असत्या तर आज अशी स्थिती झाली नसती असे भागवत म्हणाले. त्यामुळे आपल्या पूर्वजांकडून चुका झाल्या आहे हे आपण कबूल केले पाहिजे. कारण सर्वांच्याच पूर्वजांकडून चुका झाल्या असे ही ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या