(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur News: नागपुरच्या धोकादायक होर्डिंगवर आता ड्रोनची नजर; राज्यातला पहिलाच ड्रोन सर्व्हेचा प्रयोग
घाटकोपरच्या होर्डींगच्या दुर्दैवी घटनेनंतर नागपूर महानगरपालिका देखील अलर्ट मोडवर आली आहे. होर्डिंग्सचा संभाव्य धोका लक्षात घेता शहरातील सर्व होर्डिंग्सचा ड्रोन द्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
Nagpur News नागपूर : घाटकोपर मधील होर्डींग (Ghatkopar Hoarding Accident) कोसळल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) देखील अलर्ट मोडवर आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता महानगरपालिका शहरातील उंच इमारती आणि रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या मोठ्या होर्डिंग्सचे सर्वेक्षण करणार आहे. शहरातील उंचावर तसेच इमारतींच्या कडेवर, धोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंगचा सर्वेक्षण करण्यासाठी नागपुरात (Nagpur News) पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यामुळे घाटकोपर मधील अपघातानंतर उशीरा का होईना प्रशासन मात्र खडबडून जागे झाल्याचे बघायला मिळत आहे.
राज्यातला पहिलाच ड्रोन द्वारे सर्व्हेचा प्रयोग
नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी ड्रोनच्या मदतीने 360 डिग्री मध्ये तसेच थ्री डी पद्धतीने होर्डिंग्सचा चित्रीकरण करत आहे. त्याद्वारे होर्डींगचा आकार परवानगी पेक्षा जास्त तर नाही, सोबतच ज्या लोखंडी सांगाड्यावर होर्डिंग लावण्यात आलेला आहे, तो लोखंडी सांगाडा सुरक्षित आहे की नाही, त्याचा पाया भक्कम आहे की नाही, होर्डिंग चे सर्व नटबोल्ट आणि वेल्डिंग भक्कम आहेत की नाही, हे सर्व ड्रोनच्या साह्याने तपासले जात आहे.
सध्या धरमपेठ परिसरात प्रायोगिक तत्त्वावर हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ड्रोनच्या माध्यमातून होर्डिंगची अचूक तपासणी शक्य आहे. हे लक्षात आल्यावर नागपुरातील सर्वच भागांमध्ये अशाच पद्धतीने सर्वेक्षण केले जाईल, असं मनपा अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ड्रोनद्वारे होर्डिंग सर्वेक्षणाच्या या पहिल्या प्रयोग नागपुरात राबवला जात असल्याची माहितीही महानगरपालिकेचे अधकाऱ्यांनी दिली आहे.
दोन दिवसात 356 होर्डींगवर कारवाई
घाटकोपर होर्डींग दुर्घटनेनंतर यवतमाळ जिल्हा प्राशसन खडबडून जागे झाले असून यवतमाळ शहरातील 57 होर्डींगसह जिल्ह्यातील 376 अनधिकृत होर्डींग काढण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील आर्णी, दारव्हा मार्ग, पांढरकवडा मार्ग, दत्त चौक परिसर, संविधान चौक परिसर, तहसील चौक येथे मोठे होर्डींग हटविण्यात आले आहे. तर दहा नगरपालिकेच्या बाजार विभागाकडून कारवाई केली जात आहे. काही परिसर होर्डिंगसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित केला जाणार आहे. येथे कोणालाही होर्डिंग लावता येणार नाही ,त्याचेही नियोजन सध्या महापालिकेकडून सुरू केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या