(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Crime : लग्नासाठी प्रियकराचा नकार, दुखावलेल्या प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल...
Nagpur Crime: ज्याच्यासाठी घरच्यांशी संघर्ष केला त्याने ऐनवेळी साथ देण्यास नकार दिल्याने नागपुरातील एका तरुणीने आत्महत्या केली आहे.
Nagpur Crime : प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. ज्याच्यासाठी घरच्यांशी संघर्ष केला त्यानेच लग्नाला नकार दिल्याची सल मनात असल्याने त्या तरुणीने आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणीने चिठ्ठी लिहून ठेवली होती, त्यातून हे उघड झालं.
एकाच महाविद्यालयात शिकत असताना एकमेकांना बघितलं आणि पहिल्या नजरेत प्रेम झालं. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. महाविद्यालयातदेखील अनेकांना याची माहिती होती. लवकरच हे लग्न करतील, असाच अनेकांचा अंदाज होता. त्यांनी लग्नाच्या आणाभाकादेखील घेतल्या होत्या. मात्र त्यांच्या नात्याला कुणाची तरी नजर लागली अन् तरुणीने आपला जीव दिला. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने उच्चशिक्षित तरुणी तणावात गेली अन् त्या तणावातून तरुणीने आत्महत्या केली. दीक्षा (वय 28) असे संबंधित तरुणीचे नाव आहे. शांतीनगर पोलिस (Nagpur Police) ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
दीक्षा आणि तिचा प्रियकर अजय हे दोघेही एकाच महाविद्यालयात कार्यरत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दीक्षाने घरच्यांना तिच्या प्रेमाची माहिती दिली. मात्र तिच्या कुटुंबीयांनी अगोदर लग्नाला नकार दिला होता. मात्र तिची जिद्द आणि प्रियकरावरील विश्वास लक्षात घेता त्यांनी परवानगी दिली. मात्र ज्यावेळी तिचा प्रियकर अजयने त्याच्या घरी ही माहिती दिली तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी लग्नाला परवानगी नाकारली. अजयनेदेखील घरच्यांच्या विरोधात न जाण्याची भूमिका घेतली. ज्या प्रियकरावर स्वत:हून जास्त विश्वास ठेवला आणि प्रसंगी घरच्यांशी संघर्ष केला त्याने ऐनवेळी साथ देण्यास नकार दिल्याने दीक्षा कोलमडली. ती त्यानंतर सातत्याने तणावातच होती. अखेर तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने तिच्या मनातील सल चिठ्ठीतून व्यक्त केली. तिच्या मृत्यूची बातमी कळताच प्रियकरालाही धक्का बसला, मात्र उशीर झाला होता.
एकतर्फी प्रेमातून युवतीचा विनयभंग
दुसऱ्या एका घटनेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने 21 वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची घटना अजनीतील ओंकारनगर परिसरात घडली. रोहीत राजेश डबारे (वय 26, रा. बेसा) असे युवकाचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची 21 वर्षीय युवतीशी ओळखी झाली. त्याने तिला अभियांत्रिकीत शिकत असल्याची माहिती दिली. दररोज तो न चुकता परिसरात तिला भेटायचा. त्यातून त्याने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याचा आणि युवतीचा वाद झाला. त्यामुळे तिने बोलणे बंद करत संबंध तोडले. मात्र, तेव्हापासून रोहित दररोज युवतीचा पाठलाग करत, तिला बोलण्यासाठी बळजबरी करीत होता. दरम्यान तो युवतीशी सातत्याने फोनवरुन संवाद साधून 'तुझे लग्न कसे होते' असे म्हणून त्रास देत होता. त्याने ओंकारनगर परिसरात नाईक हॉस्पिटलजवळ युवतीला अडवले. तिचा हात पकडून गाडीवर बसण्यासाठी जबरदस्ती केली. तिने नकार देताच, तिला शिवीगाळ आणि विनयभंग करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
ही बातमी देखील वाचा...