(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Adhaar Card : नागपुरात आधार अॅट बर्थ बंधनकारक; आता जन्मतःच मिळणार बाळाचे आधार कार्ड
Nagpur: बाळाचा जन्म झाल्यावर इंडिया पोस्ट पेमेंट बँक आधार नोंदणी कर्मचाऱ्यांना बोलवून बाळाचे आधार कार्ड तात्काळ काढून देण्यात येणार आहे.
Nagpur News : आधार ओळखपत्र ही आज काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालयात बाळाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड (Aadhaar at Birth) काढणे आता बंधनकारक राहणार आहे. या संदर्भातील जिल्हाधिकारी (Nagpur District Collector) डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले आहेत.
रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक बालकाची आधारची प्रक्रिया पोस्ट विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने पूर्ण केली जाणार आहे. रुग्णालयात जन्मलेले एकही नवजात बालक आधार प्रक्रियेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची संबंधित यादीतील रुग्णालयांच्या प्रमुखांनी आणि पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी दक्षता घेण्याचेही सांगण्यात आले आहे. यासोबतच रुग्णालय प्रमुखांनी या कार्याचा मासिक अहवाल विहित नमुन्यामध्ये दरमहा जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केन्द्र येथील संस्था प्रमुखांना त्यांच्या रुग्णालयातील इमारतीत आणि रुग्णालयीन परिसरात होणाऱ्या जन्मांच्या नोंदणीसाठी निबंधक, जन्म व मृत्यू म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्वांचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय रुग्णालयातील निबंधकांनी आपल्या रुग्णालयात बाळाचा जन्म होताच बाळाचे जन्म प्रमाणपत्र काढून द्यावे, असेही सूचवण्यात आले आहे.
प्रत्येक रुग्णालयाची आधार केंद्रासोबत मॅपिंग
प्रत्येक रुग्णालयाची मॅपिंग (Hospital Mapping) करून देण्यात आली आहे. बाळाचे जन्म झाल्यावर इंडिया पोस्ट पेंमेंट बँक आधार नोंदणी कर्मचाऱ्यांना बोलावून बाळाचे आधार कार्ड तात्काळ काढून देण्यात येणार आहे. तसेच खाजगी आरोग्य संस्थांमध्ये जन्म झालेल्या बालकांची संबंधित संस्थाप्रमुखांना गुगल शिटमध्ये परिपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. संस्थेला संबंधित फॉर्म क्रमांक एक (Form No 1) भरून कार्यक्षेत्रातील झोन सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागास सादर करावा लागणार आहे. जन्माचा दाखला मिळाल्यावर संबंधित खाजगी संस्थाप्रमुखांनी इंडिया पोस्ट पेंमेंट बँक आधार नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून बाळाचे आधार कार्ड काढून देण्यात येणार आहेत.
नागरिकांना दिलासा
सध्या प्रत्येक कागदपत्रासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागतात. तसेच शासकीय कार्यालयात वेळेत काम होत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. यावर प्रशासनाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमाद्वारे नागरिकांना कागदपत्र मिळणे सोयीचे होणार आहे.
ही बातमी देखील वाचा