विसर्जनाच्या धामधुमीत मुंबईत मुसळधार पाऊस सुरु, आज हवामान विभागाचा हायअलर्ट, कुठे काय स्थिती?
Mumbai Rains: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत पावसाचे प्रमाण वाढले आहे.

Mumbai Rains: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आज (रविवार, 7 सप्टेंबर) देखील कायम आहे. सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत पावसाचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे मुंबईतील लोकप्रिय गणेश मंडळांपैकी एक असणाऱ्या लालबागच्या बाप्पाची घरी जाण्याची वाट यंदा समुद्रने अडवली आहे .रविवारी सकाळी साधारण पावणेआठ वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झालेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन अद्याप झालेले नाही .
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या परिसरात पावसाने जोर धरला आहे. रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असली तरी सध्या तरी वाहतुकीवर पावसाचा मोठा परिणाम झालेला नाही. लोकल गाड्या आणि बससेवा सुरळीत सुरू आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही तास मुंबईत जोरदार सरी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यातही रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे .
हवामान विभागाचा इशारा काय ?
ईशान्य राजस्थान आजूबाजूच्या भागात असलेला कमी दाबाचा पट्टा आता पुढे सरकत आहे .बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भागात तसेच कोकण किनारपट्टीवर पावसाला पोषक स्थिती तयार होत आहे .पुढील दोन दिवस कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने वर्तवले आहे .
आज कुठल्या जिल्ह्यात अलर्ट ?
आज हवामान विभागाने मुंबई सह ठाणे, पालघर रायगड तसेच पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे .या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय .तसेच नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजी नगर जालना अकोला अमरावती नागपूर भंडारा, गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट दिला आहे .हिंगोली परभणी नांदेड व लातूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे .उर्वरित भागात कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही .
पुढील पाच दिवस कुठे काय स्थिती ?
पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर राज्यभरात काहीसा कमी राहणार आहे .मात्र विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचे जोरदार अलर्ट देण्यात आले आहेत .
8 सप्टेंबर :वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट .परभणी हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता .
9 सप्टेंबर : हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट
10 सप्टेंबर : नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट कोल्हापूर परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला हलक्या पावसाची शक्यता .
11 सप्टेंबर : संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट .मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाची शक्यता .पुणे घाटमात्यासह पुणे जिल्हा तसेच सांगली सोलापूर जिल्ह्यालाही पावसाचा येलो अलर्ट .

























