एक्स्प्लोर
एसटी महामंडळात आता महिला कंडक्टरसोबत महिला ड्रायव्हरदेखील येणार, चालक पदासाठी 900 महिलांचे अर्ज
दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांसह एकूण 21 जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या 8022 चालक तथा वाहक पदांच्या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे 42 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.

धुळे : एसटी महामंडळाच्या चालक तथा वाहक पदाच्या भरतीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे यावेळी एसटी चालक पदासाठी तब्बल ९०० महिलांनी अर्ज केला असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत एसटी महामंडळात एकही महिला चालक नाहीये. या भरतीनंतर महाराष्ट्रभरात महिला कंडक्टरसोबत महिला ड्रायव्हरदेखील प्रवाशांच्या सेवेला येणार आहेत. या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या महिला चालक एसटी महामंडळाच्या सेवेत दाखल होणार आहेत. महामंडळाने महिलांसाठीच्या अटी शर्तींमध्ये देखील शिथिलता आणली आहे. दुष्काळग्रस्त 12 जिल्ह्यांसह एकूण 21 जिल्ह्यांमध्ये एसटी महामंडळाच्या 8022 चालक तथा वाहक पदांच्या भरतीसाठी राज्यभरातून सुमारे 42 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महिला उमेदवारांचे 932 अर्ज प्राप्त झाले आहेत. महामंडळाने आदिवासी उमेदवारांसाठी राबविलेल्या विशेष प्रचार मोहिमेमुळे अनुसूचित जमातीच्या 685 पदांसाठी 2406 अर्ज दाखल झाले आहेत. चालक तथा वाहक पदाच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची 100 गुणांची (50 प्रश्न)लेखी परीक्षा रविवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 12.30 या वेळेत होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना आवश्यक असणारे प्रवेश पत्र आणि परिक्षा केंद्राची माहिती एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याबाबतची सुचना उमेदवारांना लघुसंदेश (SMS)आणि त्यांच्या ई-मेल पत्त्यावर महामंडळातर्फे पाठवण्यात येईल. उमेदवारांनी महामंडळाच्या संकेतस्थळावरुन आपले प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावीत. तसेच प्रवेशपत्र पडताळणीसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान दीड तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
आणखी वाचा























