Maharashtra-Gujarat border : महाराष्ट्र - गुजरात सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली सुरू
ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याचे आदेश अधीक्षक, भूमी अभिलेख यांनी महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीला दिले आहेत
Maharashtra-Gujarat border : महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतींच्या हद्दीवरील महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे.
भूमी अभिलेख अधीक्षकांचे ग्रामपंचायतीला पत्र
महाराष्ट्र राज्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी व गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यातील सोलसुंबा येथील हद्दीच्या भागात अतिक्रमण वाढून महाराष्ट्र व गुजरात राज्यात वादाचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत. त्यामुळे गावांची सीमा निश्चित करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. तसा ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याचे आदेश अधीक्षक, भूमी अभिलेख यांनी महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायतीला दिले आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील वेवजी, गिरगाव, घीमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतींच्या हद्दीवरील महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे. वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं. 204 चा भूखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नं. 173 या दोन भूखंडांवर दोन राज्यांची सीमा आहे. हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या इमारती उभ्या राहात आहेत. गूगल नकाशात महाराष्ट्र सीमेवरील वेवजी, गिरगाव, गिमाणीया, झाई, अच्छाड, संभा ही गावे गुजरात राज्यात दाखवण्यात आल्याने प्रशासनाकडून चूक दुरुस्त करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्राच्या सीमेलगत वेवजी येथे गुजरातमधील नागरिकांनी घुसखोरी केल्याने महाराष्ट्र-गुजरात सीमा वाद सतत उफाळून येत आहे. या बाबत एबीपी माझाने या पूर्वीही वृत्त प्रसारीत केलं आहे त्यानंतर हद्दीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याचे दिसून येत आहे. पालघर जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र व गुजरात राज्य यांच्यातील सीमेची हद्द निशाणी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 133 नुसार कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सीमेचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत आहेत.
महाराष्ट्र राज्याची सीमा निश्चित करण्यासाठी मौजे वेवजी गावातील ज्या सर्वे क्रमांकाची हद्द निश्चित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वे नंबरचे 7/12 उतारे व नोटीस बजावण्याकामी खातेदारांची नावे व पत्ते मागवण्याचे काम सुरू आहे अस उप अधीक्षक भूमी अभिलेख शांताराम अहिरे यांनी सांगितलं आहे.