विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! पंढरपुरात आता शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्तींचा खजिना होणार भाविकांसाठी खुला
सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी वर्षभरातून देशभरातून दीड ते दोन कोटी भाविक येत असतात. आता या भाविकांना शेकडो वर्षांपूर्वीच्या पुरातन मुर्तींचा खजिना पाहण्यासाठी खुला होणार आहे.
पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी वर्षभरातून देशभरातून दीड ते दोन कोटी भाविक येत असतात. आता या भाविकांना शेकडो वर्षांपूर्वीच्या पुरातन मुर्तींचा खजिना पाहण्यासाठी खुला होणार आहे. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून एखाद्या घराण्याचा वंश संपला कि त्या घराण्यातील पूर्वांपार चालत आलेले देव्हाऱ्यातील देव हे एखाद्या मंदिरात अर्पण केले जायचे. वंशच खुंटल्यावर या कुलदेवतांवर कुलाचार करणे अशक्य होऊन जायचे. पूर्वीच्या काळापासून ह प्रथा पाळली जात आली आहे.
पंढरपूर हे पूर्वीपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असल्याने ही मंडळी आपले देव विठ्ठल मंडईत आणून देत. येथे बैरागी कुटुंब गेल्या 18 पिढ्यांपासून या मूर्ती स्वीकारून त्याचे पूजन करत आला होता. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे नामदेव महाद्वार बांधण्यापूर्वी 1997 पर्यंत येथे 33कोटी देवता मंदिर महाद्वारात होते. बैरागी यांच्या 18 पिढ्या गेली 700 वर्षांपासून येथे या मूर्ती घेण्याचे व त्यांचे पूजन करायचे काम करीत होता. यानंतर महाद्वाराच्या बांधकाम करताना हे 33 कोटी देवता मंदिर पडून या सर्व पुरातन मुर्ती मंदिर समितीने ताब्यात घेतल्या होत्या. याच मुर्त्या मंदिरातील एका खोलीत ठेवून त्याचे पूजन होत होते.
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व प्रशासनाने या मूर्ती पुन्हा एकदा बाहेर काढून यातील अतिशय पुरातन आणि दुर्मिळ मूर्ती वेगळे करायचे काम केले आहे. यात शेकडो वर्षांपूर्वीच्या कृष्ण , महादेव , गणेश , विष्णू , बालाजी , शाळीग्राम , यासह देवीच्या विविध रूपातील कोरीव मूर्ती बाजूला काढल्या आहेत . यातील काही मूर्ती तर 700 ते 1 हजार वर्षांपूर्वीच्या असून या पंचधातू , तांबे , पितळ अशा धातूंपासून बनवलेल्या भरीव मूर्ती आहेत.
काही मूर्ती एक फुटाच्या तर काही दोन फूट उंचीच्या आहेत . श्रीकृष्णाची विविध रूपे असलेल्या या कोरीव धातूंच्या मूर्ती अतिशय देखण्या व मौल्यवान आहेत . यात गरुडाची मूर्ती , महिषासुराचा वाढ करणारी महिषासुर मर्दिनीची मूर्ती , रिद्धी सिद्धीला घेऊन बसलेला गणेश , पार्वती मातेसह विराजमान महादेव अशा अनेक दुर्मिळ मूर्ती आहेत . गोपालक कृष्णाच्या मूर्तीजवळ गाई उभ्या असलेली मूर्तीही अशीच देखणी आहे . एक किलो पासून 12 किलो वजनापर्यंत या मूर्ती असून अनेक लहान मूर्ती मात्र प्रशासनाने बाजूला ठेऊन दिल्या आहेत.
आता या मूर्ती वेगळ्या केल्यावर विठ्ठल सभामंडपात या मूर्ती ठेवण्यासाठी एक दालन बनवले असून या दालनात या पुरातन मूर्ती भाविकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत . सध्या कोरोनामुळे विठ्ठल मंदिर बंद असले तरी मंदिर खुले झाल्यानंतर या देखण्या पुरातन मूर्ती पाहण्याचा आनंद देशभरातील भाविकांना घेता येणार आहे .