Maharashtra Rain : मान्सून 15 दिवस आधीच निरोप घेणार, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरु होणार परतीचा प्रवास
गेल्या वर्षी रेंगाळलेला मान्सून (Monsoon) यावर्षी मात्र 15 दिवस आधीच निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरु करणार आहे.
Maharashtra Rain News : पावसाच्या (Rain) संदर्भातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी रेंगाळलेला मान्सून (Monsoon) यावर्षी मात्र 15 दिवस आधीच निरोप घेण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून परतीचा प्रवास सुरु करेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. एरवी मान्सूनचा परतीचा प्रवास 17 सप्टेंबरपासून सुरु होतो आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून निरोप घेतो. मात्र, यावर्षी 15 दिवस आधीच मान्सून निरोप घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
दरम्यान, मान्सूननं गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरला परतीचा प्रवास सुरु केला होता. पण यावर्षी दोन आठवडे आधीच परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे. जोरदार बरसलेला मान्सून आता काही दिवसांचा पाहुणा आहे. दरम्यान, यावर्षी देशात चांगला मान्सून झाला असला तरी उत्तर भारतातल्या काही राज्यांत तो सरासरीपेक्षा कमी झाल्यानं शेतकरी संकटात आहे. उत्तर भारतातील शेतकरी अद्यापही चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद
जून महिन्यात दडी मारलेल्या पावासानं जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. यामुळं शेतकरी समाधानी झाले आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर चार जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर 9 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला आहे. राज्यातला एकही जिल्हा असा नाही की जिथे समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्याच्या सर्वच भागात समाधनकारक पावसानं हजेरी लावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rain : राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस, 24 जिल्ह्यात 60 टक्के अधिक पावसाची नोंद
- Maharashtra Rain : राज्यात पावसाची उघडीप, पुढील दोन दिवस विदर्भात यलो अलर्ट