![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Rain : राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस, 24 जिल्ह्यात 60 टक्के अधिक पावसाची नोंद
जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
![Maharashtra Rain : राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस, 24 जिल्ह्यात 60 टक्के अधिक पावसाची नोंद Maharashtra Rain 27 percent more rain than average in the state so far, according to the Meteorological Department Maharashtra Rain : राज्यात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 27 टक्के जास्त पाऊस, 24 जिल्ह्यात 60 टक्के अधिक पावसाची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/a8a4043255a96d3182abc1e610eec81b1660184598739339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत देखील झालं आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. त्यानंतर जुलै आणि चालू ऑगस्ट महिन्यात मात्र, राज्यातील सर्वच भागात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण बघितले तर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा 27 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस
राज्यात 7 ऑगस्टपासून सुरु झालेला पावसाचा धुमाकूळ आजही सुरुच आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचे देखील या पावसामुळं नुकसान झालं आहे. ओडिशावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रालाही पावसानं झोडपून काढलं आहे. राज्यातील 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 1जूनपासून राज्यात सर्वच जिल्ह्यात पावसाचं प्रमाण समाधानकारक आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 जूनपासून राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस झाल्याचं हवामान खात्यानं सांगितले आहे. राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याचे दिसत आहे.
चार जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस
राज्याच्या अनेक भागात गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. अनेक भागात गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. 7 ऑगस्टपासून झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, 24 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 60 टक्के जास्त पाऊस झाला आहे, तर चार जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर 9 जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला आहे. राज्यातला एकही जिल्हा असा नाही की जिथे समाधानकारक पाऊस झाला नाही. राज्याच्या सर्वच भागात समाधनकारक पावसानं हजेरी लावली आहे. सध्या मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस पडत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Rain : आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, तर विदर्भात यलो अलर्ट
- Hingoli: ईसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडले; मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)