मोहिते-पाटील यांची निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाची नोंदणी, स्थानिक आघाडी असल्याचा धैर्यशील मोहिते पाटील यांचा दावा
कृष्णा भीमा विकास आघाडी ही फक्त स्थानिक आघाडी असून आम्ही भाजपमध्येच आहोत आणि राहणार आहोत. प्रत्येक तालुक्यात असतात तशी आघाडीची नोंदणी सुरु असून याबाबत भाजपाला माहिती असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
![मोहिते-पाटील यांची निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाची नोंदणी, स्थानिक आघाडी असल्याचा धैर्यशील मोहिते पाटील यांचा दावा Mohite-Patil registers new party with Election Commission, dhairyashil Mohite Patil claims to have local lead मोहिते-पाटील यांची निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाची नोंदणी, स्थानिक आघाडी असल्याचा धैर्यशील मोहिते पाटील यांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/03/30/4d008994d89c8c476ef80cf00ce60c80_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील कायम चर्चेत असलेले घराणे म्हणजे अकलूजच्या मोहिते पाटील. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये स्थिरावलेल्या मोहिते पाटील यांनी आता नवीन राजकीय पक्षाच्या नोंदणीचे प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे. या चर्चेने भाजप नेत्यांचीही चिंता वाढू लागली आहे. मात्र हा पक्ष नसून स्थानिक राजकारणासाठी बनवलेली आघाडी असल्याचा दावा धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे.
विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू विश्वतेजसिंह यांच्या अध्यक्षतेखाली मोहिते पाटील गटाने कृष्णा भीमा विकास आघाडी या नावाने निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून पक्ष नोंदणीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे. या घडामोडीतून विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू विश्वतेज रणजितसिंह मोहिते पाटील यांचे लॉन्चिंग केले जात असल्याचीही चर्चा असताना मोहिते पाटील कुटुंबाकडून याचा इन्कार करण्यात आला आहे.
विजयसिंह मोहिते पाटील अजून राजकारणात असताना त्यांच्या नातवाचे काय काम असा सवाल धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. कृष्णा भीमा विकास आघाडी ही फक्त स्थानिक आघाडी असून आम्ही भाजपमध्येच आहोत आणि राहणार आहोत. प्रत्येक तालुक्यात असतात तशी आघाडीची नोंदणी सुरु असून याबाबत भाजपाला माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापुढील सर्व निवडणूक भाजपच्या चिन्हांवरच लढवण्यात येणार असले तरी कुठे युती करण्यास अडचण येऊ लागल्यास या आघाडीचा वापर होईल, असा खुलासाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरण हे पश्चिम महाराष्ट्रातील हजारो नागरिकांचे स्वप्न असल्याने ते नाव या आघाडीला दिल्याचेही मोहिते पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)