Mission Kavach Kundal : राज्य सरकारचं 'मिशन कवच कुंडलं'; दररोज 15 लाख लसीचे डोस देण्याचं उद्दिष्ट, आरोग्यमंत्र्यांची माहिती
Mission Kavach Kundal : राज्य सरकार 'मिशन कवच कुंडलं' राबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत हे मिशन राबवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
![Mission Kavach Kundal : राज्य सरकारचं 'मिशन कवच कुंडलं'; दररोज 15 लाख लसीचे डोस देण्याचं उद्दिष्ट, आरोग्यमंत्र्यांची माहिती Mission Kavach Kundal State government's aim is to give daily dose of 15 lakh vaccines says health minister Mission Kavach Kundal : राज्य सरकारचं 'मिशन कवच कुंडलं'; दररोज 15 लाख लसीचे डोस देण्याचं उद्दिष्ट, आरोग्यमंत्र्यांची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/11/960897626fa0736f95cdd3c1292a8e2c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mission Kavach Kundal : देशासह राज्यातही कोरोनाच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच देशात कोरोना लसीकरण मोहीमही राबवली जात आहे. अशातच आज घटस्थापनेच्या दिवशी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी 'मिशन कवच कुंडलं' (Mission Kavach Kundal)ची घोषणा केली आहे. दसऱ्यापर्यंत देशभरात 100 कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण करण्याचं केंद्र सरकारचं उद्दीष्ट आहे. त्या दृष्टीकोनातून राज्यही प्रयत्नशील आहे. राज्यात दररोज 15 लाख लोकांना लस देण्याचं उद्दीष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे. सध्या महाराष्ट्र सरकारकडे 1 कोटी लशींचा साठा असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
"15 ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्याच्या दिवसापर्यंत देशात 100 कोटी लसीकरण व्हावं, असं केंद्रानं ठरवलं आहे. त्यासाठी महाराष्ट्र देशातल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा कमी नाही. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील माझ्याशी फोनवर चर्चा करून राज्याचा या 100 कोटींच्या लसीकरणात मोठा सहभाग असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यासाठी आपण मिशन कवच कुंडल योजना 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राबवणार आहोत. रोज किमान 15 लाख लसीकरण करण्याचं लक्ष्य आपण ठेवलं आहे. पूर्वी लस उपलब्ध नसायची तशी परिस्थिती आता नाही. या क्षणाला 75 लाख लसी आपल्याकडे उपलब्ध आहेत. 25 लाख लसी आज उपलब्ध होतील. त्यामुळे 15 लाख लसीकरण रोज केलं तर 6 दिवसांत हा स्टॉक पूर्णपणे संपवण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागाला दिलं आहे.", असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं
"आजपर्यंतच्या लसीकरणाची एकूण टक्केवारी पाहाता राज्याला एकूण 9 कोटी 15 लाख एवढ्या नागरिकांचे दोन्ही डोस करायचे आहेत. यातल्या 6 कोटी नागरिकांना पहिला डोस पूर्ण झालेला आहे. उर्वरीत 3 कोटी 20 लाख नागरिकांना पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट आहे. ते झालं तर राज्यातल्या 18 वर्षांवरील जवळपास सर्व नागरिकांना पहिला डोस पूर्ण होईल." , अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, "अडीच कोटी नागरिकांना दुसरा डोस देऊन झाला आहे. टक्केवारीनुसार, 65 टक्के नागरिकांना पहिला डोस आणि 30 टक्के नागरिकांना दुसरा डोस आपण पूर्ण केला आहे. आता पहिल्या डोसला प्राधान्य द्यायचं आहे. त्यानुसार, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कमी होण्यास मदत होईल.", असा विश्वास देखील राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पवारांशी संबंधित साखर कारखाने आणि संचालकांच्या घरी आयकर विभागाचं धाडसत्र
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)