Manoj Jarange : खपाखपा सही केली, दणादणा निघून गेलो, फसवून झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप
Maratha Reservation : प्रजासत्ताक दिनाचा आणि मोर्चाचा कोणताही संबंध जोडणार नाही, आम्ही उद्या प्रजासत्ताक दिन साजरा करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
पुणे : सकाळी कुणीतरी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात माझी सही घेतली, कोर्टाचे कागदपत्रं असल्याचं सांगत त्यांनी माझी सही घेतली, पण त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला. लोणावळ्यातून आज मनोज जरांगे हे वाशीकडे निघाले असून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे. मनोज जरांगेंचा मुक्काम आज वाशीमध्ये असणार आहे.
मला फसवून सही घेतली
मनोज जरांगे म्हणाले की, सकाळी कुणीतरी अधिकारी आला आणि त्याने मला कोर्टाचा कागद असल्याचं सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मान सन्मान ठेवतो, त्यामुळे मी लगेच सही केली. त्यात एक मराठी कागद होता आणि एक इंग्रजी कागद होता. पण सकाळी मोर्चाची गडबड असताना, मी झोपेत असताना माझी सही घेतली. माझ्यासह यात इतर नऊ जण असल्याचं सांगत त्यांनी सही घेतली.
मला इथले रस्ते माहिती नाहीत
मनोज जरांगे हे आपल्या आंदोलक समर्थकांसह आज लोणावळ्याहून वाशीकडे निघाले आहेत. त्यामुळे जरांगे जात असलेल्या रस्त्यावर मोठी रुग्णालयं असल्याने त्यांनी या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी विनंती पोलिसांनी केली. त्यानंतर बोलताना जरांगे म्हणाले की, मला इथले रस्ते माहिती नाहीत. त्यामुळे ही कामगिरी इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवली आहे. आता कार्यकर्ते आणि पोलीस सांगतील तसं मी जाणार. आज मुक्काम वाशीला असणार आणि उद्या आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर जाणार.
प्रजासत्ताक दिन साजरा करणार
उद्या प्रजासत्ताक दिन आहे, पण त्याचा आणि मोर्चाचा आम्ही कोणताही संबंध जोडणार नाही. प्रजासत्ताक दिन हा सर्वात वर आहे. त्यामुळे आम्हीही तो साजरा करणार असल्याचं मनोज जरांगे म्हणाले.
आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनोज जरांगे यांना परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी ठाम आहेत. आम्ही आझाद मैदानात जाऊन बसणार आहोत, आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे. जरांगे पाटील यांनी आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
ही बातमी वाचा:
VIDEO : Manoj Jarange Rally : मला मुंबईतले रस्तेच कळत नाही, पोलिसांच्या विनंतीला जरांगेंचं उत्तर