Beed : मनोज जरांगेंचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला, डोकं फुटून रक्तबंबाळ; मराठा आंदोलनात सहभागी असल्यानेच हल्ला झाल्याचा आरोप
Amol Khune Attack : अमोल खुणे त्यांच्या गावी जात असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला. त्यामध्ये अमोल खुणे हे जबर जखमी झाले.
बीड : मराठा आरक्षणासाठी लढणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांचे समर्थक असलेले अमोल खुणे (Amol Khune) यांच्यावर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेवराईहून आपल्या धानोरा गावी जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या चार जणांनी अमोल खुणे यांच्यावर अचानक दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर मार लागला.
या हल्ल्यात जबर जखमी झालेले अमोल खुणे रस्त्यावर उभे असताना त्यांना काही स्थानिक लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
कोपर्डी बलात्कारातील आरोपीवर केला होता हल्ला
कोपर्डी बलात्कारातील आरोपीवर हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुणे हे दोन वर्ष जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर अमोल खुणे यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत काम सुरू केलं. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप सहकाऱ्यांनी केला आहे.
काय आहे कोपर्डी प्रकरण?
- 13 जुलै 2016 रोजी कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.
- नोव्हेंबर 2017 मध्ये जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष मवाळ यांना दोषी ठरवण्यात आले.
- जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा आणि उर्वरित दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
- फाशीच्या शिक्षेच्या विरोधात जितेंद्र शिंदेकडून मुंबई हायकोर्टात अपील करण्यात आलं.
- जितेंद्र शिंदेच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरुच आहे.
- सप्टेंबर 2023 रोजी जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा देण्यात यावी मागणीसाठी कोपर्डी ग्रामस्थांनी उपोषण केले होते.
- 10 सप्टेंबर 2023 रोजी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही बातमी वाचा: