आमदार होईपर्यंत सेकंड हँड दुचाकीवरून फिरलो; एक लाख रूपयांत निवडणूक जिंकणाऱ्या विनोद निकोलेंनी सांगितला थक्क करणारा प्रवास
majha katta : पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले विनोद निकोले यांना सांपत्तिक दृष्ट्या सर्वात गरीब आमदार म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडे एक गुंठाही जमीन नाही, शिवाय त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घरही नव्हते.
Majha Katta : "निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी जवळ फक्त एक लाख रूपये होते. यातील 50 हजार रूपये भावाने दिले होते आणि पक्षाने 50 हजार रूपये दिले होते. आमचं राजकारण हे पैशावर अवलंबून नाही तर ते विचारांवर आहे. मतदारसंघात पैसे वाटण्यासाठी कोण आले तर संघटनेतील लोक त्यांना तिथून हाकलून लावत असत. लोकांचे प्रश्न घेऊन मी कायम रस्त्यावर उतरत होतो. त्यामुळे लोकांचा माझ्यावर विश्वास होता आणि याच विश्वासावर निवडून आलो, असे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे माकपचे आमदार विनोद निकोले ( vinod nikole) यांनी सांगितले. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर विनोद निकोले यांनी मनमोकळे पणाने संवाद साधला आणि आपल्या खडतर प्रवासाच्या आठवणी जागवल्या.
पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले विनोद निकोले यांना सांपत्तिक दृष्ट्या सर्वात गरीब आमदार म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडे एक गुंठाही जमीन नाही, शिवाय त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घरही नव्हते. अलीकडेच त्यांनी घर बांधले आहे. अशाच काही गोष्टींचा उलगडा त्यांनी माझा कट्ट्यावर केला.
"आई-वडील मजूर होते. परंतु, दोघांचीही मुलाने खूप शिकावं अशी इच्छा होती. एसवायपर्यंतचं शिक्षण घेतलं. परंतु, घरच्या बिकट परिस्थिमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. डहाणू शरातरच चुलत भावाचे छोटेसे हॉटेल होते. ते चालवत असताना तेथे माकपचे एल. बी. धनगर हे हॉटेलवर चहा घेण्यासाठी येत असत. त्यांनी माकपचा कार्यकर्ता म्हणून फॉर्म भरून घेतला. तेथून सामाजिक कार्याला सुरूवात केली, असे निकोले यांनी सांगितले.
राजकीय वाटचालीबद्दल सांगताना निकोले म्हणाले, "कॉलेज जीवनापासूनच अन्यायाविरोधात मनात चिड होती. त्यातूनच राजकारणात आलो. अनेक आंदोलने केली. डहाणूमध्ये रेशन धान्याचा काळा बाजार होत असे, याविरोधात पहिले आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर रीलायन्सच्या वीज कंपनीविरोधात आंदोलन केले. हे आंदोलन देखील यशस्वी झाले. त्यामुळे पक्षाने काम पाहून सेकंड हँड दुचाकी घेण्यासाठी 15 हजार रूपये मंजूर केले. परंतु, ही गोष्ट आधी काम करत असलेलल्या ठिकाणी समजल्यानंतर मालकाने त्यांच्याकडील सेकंड हँड दुचाकी मला दिली. त्यामुळे पक्षाने मंजूर केलेले 15 हजार रूपये मी पक्षाच्याच कामासाठी वापरले. आमदार होईपर्यंत याच दुचाकीवरून फिरलो."