Main Rajaram Ground Report : ज्या शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, जयंत नारळीकर शिकले, तोच मेन राजारामचा ज्ञान'दीप' विझवण्याचा कट कोण रचतंय?
नवनिर्माणाचा ध्यास नाहीच, पण जे लोकराजा राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराजांनी जो शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वारसा दिला आहे तोच संपवण्याचा कुटील डाव कोल्हापूरमध्ये रचला जात आहे.
Main Rajaram Highschool Ground Report : नवनिर्माणाचा ध्यास नाहीच, पण लोकराजा राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराजांनी जो शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वारसा दिला आहे तोच संपवण्याचा कुटील डाव कोल्हापूरमध्ये रचला जात आहे. आता यामध्ये करवीर नगरीतील ऐतिहासिक मेन राजारामची भर पडली आहे. तब्बल 772 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय करून देदीप्यमान वारसा संपवताना यांचं काळीज तरी कसं थरथरत नाही, असाच काहीसा प्रश्न पडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मेन राजारामच्या स्थलांतरचा घाट घातला जात असल्याची कुजबूज शिक्षक,विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये होती. मात्र, जेव्हा स्थलांतरसाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरु झाल्याचे समजताच कोल्हापूरसह जिल्ह्यात संतापाचा उद्रेक झाला आहे. समस्त कोल्हापूरकरांनी आता निर्णायक लढ्याचा निर्णय घेतला आहे. मेन राजाराम बचाव समितीने आताही नाही, कधीच होऊ देणार नाही, पालकमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करणार नाही, निर्णय रद्द झाल्याचे 15 दिवसांत जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
कोल्हापूरच्या वैभवात भरणारी वास्तू
मेन राजाराम ही फक्त वास्तू नसून तो कोल्हापूरचा ऐतिहासिक ठेवा आहे. मेन राजारामची स्थापना 1870 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून मेन राजाराममध्ये अनेक रथी, महारथी शिकले आहेत. त्यांनी फक्त देशात नव्हे, तर जगाच्या पाठीवर आपल्या नेतृत्वाचा आणि संशोधनाचा ठसा उमटवला आहे. महादेव रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, जागतिक किर्तीचे संशोधक जयंत नारळीकर असे दिग्गज या शाळेत शिकून मोठे झाले आहेत. अशा महनीय व्यक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इमारतीवर काहींनी डोळा ठेवत यात्री निवास सुरु करण्याचा घाट घातला आहे.
मेन राजाराममध्ये किती विद्यार्थी शिकत आहेत?
सध्या मेन राजाराममध्ये 772 विद्यार्थी शिकत आहेत. यामध्ये सर्वाधिक 432 विद्यार्थीनी असून गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. मेन राजाराममध्ये शिकत असलेल्या सर्व मुली करवीर तालुक्यातील ग्रामीण भागातील आहेत. ज्या मुलींची अडचण आहे, त्यांना शाळेकडून वसतीगृहाची सोय करण्यात आली आहे. मध्यवर्ती परिसरात शाळा असल्याने अनेक मुलींना सुरक्षित वाटते.
ऐतिहासिक अशा शाळेत भव्य अशी लॅब
मेन राजारामची इमारत ऐतिहासिक आणि वास्तूकलेचा आदर्श नमुना ठरावा अशी आहे. शाळेच्या एकूण 26 खोल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या शाळेला नसेल, अशी सुसज्ज लॅब या शाळेमध्ये आहे. शाळेच्या परिसरात प्रशस्त प्रांगण सुद्धा आहे. शाळेची लॅब पाहिल्यास ज्यांनी पैशाच्या जोरावर खासगी दुकानदारी सुरु केली आहे त्यांनाही उभा करता येणार नाही, अशी सुसज्ज लॅब आहे. ज्यामध्ये विद्यार्थी शिकून पुढे जात आहेत.
तांत्रिक शिक्षण अवघ्या 1 हजार रुपयात
मेन राजाराममध्ये जे तांत्रिक शिक्षणाचे (टेक्निकल कोर्सेस) कोर्सेस आहेत ते अवघ्या 1 हजार रुपयांमध्ये शिकवले जातात. ज्याची फी खासगीत काही हजारांमध्ये आहे. व्यावसायिक शिक्षणाचा पायाच पक्का करण्याचे काम या शाळेत केले जाते.
शिक्षकांची नेमणूक का केली नाही?
मेन राजारामध्ये रिक्त पदांसाठी शिक्षक भरती करण्यात आलेली नाही. मेन राजाराम शाळा ही जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येते. काही शिक्षक पदोन्नतीने बाहेर गेल्यानंतर काही जागा रिक्त होत्या, त्या 2016 पासून भरण्यात आलेल्या नाहीत. पवित्र पोर्टलचा खेळखंडोबा, कोरोना महामारी आदी कारणांमुळे रिक्त जागा भरल्याच गेल्या नाहीत. त्यामुळे यामागे काय गौडबंगाल आहे हे कळत नाही.
मेन राजाराममध्ये कोणते विषय शिकवले जातात?
मेन राजाराममध्ये टेक्निकल, माहिती तंत्रज्ञान, रिटेल मार्केटिंग, टुरिझम अशा बहुपर्यायी विषयांची सोय असलेलं शासकीय महाविद्यालय आहे. त्याचबरोबर निवडणुकीसाठी 4 केंद्र, परीक्षा केंद्र, टायपिंग, स्टेनो, चित्रकला, विविध शिष्यवृत्ती परीक्षा केंद्र, शासकीय बैठक व प्रशिक्षण इत्यादीसाठी उपलब्ध होते.
इतर महत्वाच्या बातम्या