Mahatma Phule Jayanti 2023: 'विद्ये विना मती गेली, मती विना निती गेली'; वाचा महात्मा फुलेंचे प्रेरणादायी विचार
महात्मा फुलेंनी (Mahatma Phule) आपलं अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी वाहिलं. महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात...
Mahatma Phule Jayanti 2023: सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा फुले (Mahatma Phule) यांची आज (11 एप्रिल) जयंती.11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या महात्मा फुलेंनी आपलं अख्खं आयुष्य समाजसेवेसाठी वाहिलं. स्त्री शिक्षण आणि समानता यासाठी महात्मा फुले यांनी लढा दिला. महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात...
महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार
1. विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।। वित्ता विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले- या महात्मा फुले यांच्या विचारामधून आपल्याला विद्येचे महत्व कळते.
2. 'धर्म म्हणजे जो समाजाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी असतो. जो धर्म समाजाच्या हिताचा नाही तो धर्म नाही.'
3. समाजाच्या विकासासाठी समाजातील सर्व लोकांना स्वातंत्र्य आणि समतेचा अधिकार मिळणे आवश्यक आहे आणि त्यांच्यामध्ये बंधुभाव असणे आवश्यक आहे.
4. खाण्यापिण्याच्या सवयी आणि वैवाहिक संबंधांवर जातीय निर्बंध असेपर्यंत भारतात राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही.
5. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.
6. स्त्री असो वा पुरुष, सर्व समान असतात. त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव हा मानवतेच्या आणि नैतिकतेच्या विरुद्ध आहे.
महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्व, समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी या सर्व गोष्टींच्या विरोधात लढा दिला. शिक्षणाचे महत्त्व समजातील लोकांना पटवून देऊन मुलींसह सर्व शोषित घटकांना शिक्षण मिळायला हवे, अशी त्यांनी मागणी केली. एक जानेवारी 1848 मध्ये त्यांनी मुलींसाठी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली शाळा सुरू केली.
1888 मध्ये मुंबईत जोतीराव फुले यांचा रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि महात्मा ही पदवी देण्यात आली.
महात्मा फुले हे लेखक देखील होते. समाज यांनी 1855 मध्ये तृतीय रत्न हे नाटक लिहीले.समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी यावर भाष्य करणारे 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ लिहीला. समाज प्रबोधन आणि परिवर्तनवादी चळवळीसाठी हा महत्त्वाचा ग्रंथ ठरला.
28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले. आजही त्यांचे विचारांमुळे समाजातील तरुण पिढी प्रेरित होते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: