मुंबईकरांनो, पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा; कोकणासह मराठवाड्याला यलो अलर्ट
Maharashtra Weather Forecast : पुढील 48 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) पुढील 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या दक्षिण कोकणात बहुतेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज
पुढील 48 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सरी पाहायला मिळाल्या आहेत. नागरिकांचे डोळे मान्सूनकडे लागले आहेत. सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
आज ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या भागात पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यात पुढील 48 तासांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि अहमदनगर या भागात काही ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळेल.
#हवामानअंदाज
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 6, 2024
दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता.#WeatherUpdate pic.twitter.com/npH3wWINbR
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज
देशात सध्या ऊन-पाऊस असं वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर भारतातील जनता उष्णतेच्या झळांनी त्रस्त आहे. दुसरीकडे केरळ, तामिळनाडूमध्ये जोरदार मान्सूनची हजेरी पाहायला मिळत आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू देश व्यापणार आहे. सध्या अनेक भागात उष्णतेची लाट असली तरी, देशात हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एल निनो संपून आता ला निनो सुरु होणार आहे. यामुळे यंदा जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.